जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. या नव्या सरकारला स्थापन होऊन एक महिना उलट त्याला तरी या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात याबाबत अजूनही चर्चा झाली नसल्यानं विस्तार रखडल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांशी कॅबिनेट विस्तारावर चर्चा करण्यास शाहांना वेळ नसल्याचे सांगितलं जात आहे. मात्र अशातच भाजपचे संकटमोचक नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली आहे. त्यामुळे सहाजिकच अमित शाह गिरीश महाजन यांच्या भेटीत शिजलं काय? अस सवाल, राज्याच्या राजकारणात उपस्थित झाला आहे.
शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. अमित शाह यांच्या भेटीची वेळ मिळत नसल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र व्यस्त कार्यक्रमात अचानक गिरीश महाजनांना भेटण्यास शाहांना वेळ मिळाला, मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी कॅबिनेट विस्तारावर चर्चा करण्यास शाहांना का वेळ नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, गिरीश महाजन यांनी अमित शहा यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचे बोललं जात आहे. मात्र गिरीश महाजन यांनी खुद्द शहा यांच्या भेटीमागचं कारण सांगितलं आहे. विविध विषयांवर मुख्यतः नाशिक व जळगाव जिल्ह्यातील विषयांवर चर्चा केली” अशी माहिती खुद्द गिरीश महाजन यांनी दिली. शाहांसोबत भेटीचा फोटो ट्वीट करत महाजनांनी चर्चेचा तपशील सांगितला. अमित शाह यांच्याकडे सहकार खाते आहे. नुकतंच राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं वर्चस्व असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ राज्य सरकारने बरखास्त केलं. तिथे भाजपचे आमदार आणि गिरीश महाजन यांचे समर्थक मंगेश चव्हाण यांना प्रशासक मंडळाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले. याबाबत गिरीश महाजनांनी शाहांना माहिती दिल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे