पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण मोहीम आवश्यक : जिल्हाधिकारी
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । निसर्ग मानवाला खूप काही देत असतो. याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.
बांधकाम क्षेत्रातील “क्रेडाई” या संस्थेतर्फे शुक्रवार दि. २२ जुलै रोजी कोल्हे नगर परिसरामध्ये गट नंबर ६९ येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड होते. “क्रेडाई”चे महाराष्ट्र राज्याचे सहसचिव अनिश शहा, जैन व्हॅलीचे उद्यान विभाग प्रमुख अजय काळे, जैन इरिगेशनचे जनसंपर्क विभागाचे अनिल जोशी, ‘क्रेडाई’ जळगावचे अध्यक्ष हातिम अली, सचिव दीपक सराफ मंचावर उपस्थित होते.
प्रथम “क्रीडाई” संस्थेविषयी अनिश शहा यांनी माहिती दिली. त्यानंतर महापालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड यांनी सांगितले की, शहरात अधिकाधिक झाडे लावण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. वृक्षारोपणासह वृक्ष संवर्धनाची देखील जबाबदारी नागरिकांनी घेतली पाहिजे. अधिकाधिक खुल्या जागांवरती देखील वृक्षारोपण झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले की, वृक्ष लागवड ही एक व्यापक चळवळ झाली असून, “जगा, जगवा अन् जगू दया” हा जीवन मंत्र आत्मसात करुन वृक्षारोपण मोहिमेत सामाजिक बांधिलकीतून सहभागी व्हावे. वृक्षारोपणामुळे निसर्गात चैतन्य पसरते. वृक्षांमुळे मानवी जीवनाला प्रसन्नता लाभते, असेही ते म्हणाले. यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि आयुक्त विद्या गायकवाड यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणासाठी जैन उद्योग समूहाने झाडे उपलब्ध करून दिली आहेत. चंदन कोल्हे यांनी वृक्षसंगोपनव संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे.
सूत्रसंचालन व आभार ललित भोळे यांनी मानले. प्रसंगी ‘क्रेडाई’ संस्थेचे सूत्रसंचालन व आभार खजिनदार ललित भोळे यांनी मानले. प्रसंगी ‘क्रेडाई जळगाव’ संस्थेचे धनंजय जकातदार, प्रवीण खडके, निर्णय चौधरी, किशोर बोरोले, आबा चव्हाण, अँड.पुष्कर नेहते, सुनील राणे, चंदन कोल्हे, बंटी पाटील, निलेश पाटील हे उपस्थित होते. प्रसंगी स्थानिक रहिवासी पियुष कोल्हे, अशोक चौधरी, भूषण चौधरी, प्रदीप वाघ, शैलेश जावळे आदींनी सहकार्य केले.