राजू मामांना आली उशिरा जाग पण अघोषित उदघाटन करीत दिलगिरीची गुगली!
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । जळगाव शहराचे आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे यांनी बुधवारी आपल्या चारचाकी ने शिवाजीनगर पुलाला फेरफटका मारला. यावेळी त्यांनी अंतिम टप्प्यात आलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली व लवकरच या पुलावरची वाहतूक सुरू होईल अशी घोषणा करत असतांना पुलाचे अघोषित उदघाटन केले.
मात्र गेल्या साडेतीन वर्षापासून बांधकाम सुरू असताना आमदार भोळे यांनी या पुलाची पाहणी का केली नाही? याचबरोबर ज्या ज्या वेळा या पुलाबाबत नागरिकांनी व विविध संघटनांनी तथा पक्षांनी आंदोलन केली अशावेळी आमदार भोळे त्या ठिकाणी उपस्थित का राहिले नाहीत? ज्यावेळी विविध संघटना या ठिकाणी आंदोलन करत होत्या नागरिकांच्या समस्या मांडत होत्या. त्यावेळी आमदार भोळे यांनी पुलाचे काम पूर्ण व्हावे यासाठी कोणतेही आंदोलन का केले नाही? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम संथ गतीने झाल्यामुळे शिवाजीनगर भागातील नागरिकांना जो त्रास सहन करावा लागला त्याबाबत आमदार भोळे यांनी जळगाव लाईव्ह बोलताना सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त केली. मात्र आमदार भोळे यांच्यावर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ का आली? संबंधित विभागासोबत योग्य वेळी योग्य त्या बैठका घेतल्या असत्या तर ही दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत.
यावेळी बोलताना आमदार भोळे म्हणाले होते की, पुलाचे काम वेळेत होणे गरजेचे होते मात्र तांत्रिक अडचणी असल्याने पुलाचे काम लांबले गेले. आता मात्र पुलाचे काम पूर्ण होत आले असून आठवड्याभरात हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. यामुळे शिवाजीनगर भागातील रहिवाशांच्या समस्या मार्गी लागणार आहेत. हे जरी आमदार भोळे म्हणाले असले तरी या सगळ्यांमध्ये जो मुख्य प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, गेल्या साडेतीन वर्षांपासून नागरिकांची होत असलेली हेळसांड आणि त्यांना झालेला त्रास हा एका दिलगिरी मधून शमू शकेल का? नागरिकान पुढे दिलगिरी व्यक्त केल्यानंतर नागरिक आमदारांना माफ करतील का? गेल्या साडेतीन वर्षांपासून जो मनस्ताप जळगाव शहरातील नागरिक किंबहुना शिवाजी नगर परिसरातील नागरिक सहन करत आहेत. याबाबत फक्त ‘दिलगिरी’ हा शब्द पुरेसा आहे का?
नागरिकांची ‘ही’ अडचण आमदार साहेब लवकर सोडवणार का?
शिवाजी नगर उड्डाणपूल पूर्ण होत असताना ज्या नागरिकांना पायी खाली यायचे आहे. अशांसाठी कोणताही जिना बनवण्यात आला नाहीये. यामुळे हा जिना लवकरात लवकर बनवण्यासाठी आमदार पुढाकार घेतील का?