जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी सकाळी इंधनाचे दर जाहीर केले आहे. त्यानुसार आज देखील पेट्रोल डिझेलचा दर जैसे थे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जळगावमध्ये आज पेट्रोलची किंमत १०७. ६० रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९४.०३ प्रति लिटर इतकी आहे.
दरम्यान, इंधन दर स्थिर असले तरी मात्र दुसरीकडे सीएनजी, पीएनजी आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ सुरूच आहे. याचा मोठा आर्थिक फटका हा ग्राहकांना बसत आहे. सीएनजीचे दर वाढल्याने ओला, उबेरसारख्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या भाड्यात वाढ केली आहे. तसेच रिक्षा चालकांनी देखील आपले भाडे वाढवले आहेत. घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरच्या दराने हजार रुपयांचा टप्पा ओलांडल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले आहे.
पेट्रोल, डिझेलचे दर 22 मे पासून स्थिर आहेत. केंद्र सरकारने 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील पेट्रोलच्या दरात ५ रुपयाची तर डिझेल दरात ३ रुपयाची कपात करण्यात आली होती. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
नव्या दरानुसार आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये एवढा झाला आहे. तर पुण्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 106.10 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 92.58 रुपये मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 96.72 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे.