गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार : पश्चिम रेल्वेकडून ६० विशेष गाड्या
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. कारण पश्चिम रेल्वेने ६० विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकातून या विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.
गणेशोत्सव जवळ आला की मुंबईत राहणाऱ्या नोकरदारांची गावाकडे ओढ घेण्यास सुरुवात होते. परिणामी या काळात रेल्वेसह वाहतुकीच्या इतर साधणांवर प्रचंड ताण येतो. तसंच गर्दीमुळे प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही गैरसोय टाळण्यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने ६० विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबई सेंट्रल ते ठोकुर यादरम्यान ६ फेऱ्या होणार असून २३ आणि २४ ऑगस्टला या फेऱ्यांना सुरुवात होईल. तसंच मुंबई सेंट्रल ते मडगाव या मार्गावर ३४ फेऱ्या होतील. या फेऱ्या देखील २४ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.
दुसरीकडे, वांद्रे टर्मिनस ते कुडाळ (६ फेऱ्या), उधना ते मडगाव (४ फेऱ्या) आणि अहमदाबाद ते कुडाळ (६ फेऱ्या) आणि विश्वामित्री ते कुडाळ (६ फेऱ्या) या गाड्या असणार आहेत. १८ जुलैपासून या रेल्वेगाड्यांचे आरक्षण खुले होणार आहे. प्रवाशांना या गाड्यांची सविस्तर माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकृत रेल्वे संकेतस्थळावर मिळू शकणार आहे.
दरम्यान, पश्चिम रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या या विशेष रेल्वेगाड्यांमुळे गणेशोत्सवासाठी यंदा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार असून रेल्वेच्या निर्णयाबाबत प्रवाशांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.