जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । गत दोन दिवसापासून धुळे जिल्ह्यासह साक्री तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे उपनद्यांना मोठा पूर आला आहे. त्याचा परिणाम अक्कलपाडा धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे अक्कलपाडा धरणाचे १७ दरवाजे उघडण्यात आले. त्यातून सुमारे २२ हजार क्युसेस जलप्रवाह पांझरा नदीत सोडण्यात आला आहे. नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
पांझरा नदीवरील अक्कलपाडा मध्यम प्रकल्प व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत गेल्या २४ तासांत वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत पाणीपातळी सतत वाढत आहे. हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील ४८ तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पांझरा नदीच्या काठावरील गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. पांझरा नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात गुरे-ढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावेत, असे आवाहन धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
तर दुसरीकडे हवामानाच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवस महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे या भागात संपूर्ण काळजी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच शक्य असल्यास अशा भागांमधून प्रवास करू नये, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान नाशिकमध्ये अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे. याशिवाय धोक्याच्या ठिकाणी असलेल्यांनी तातडीने प्रशासनाशीसंपर्क करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असंही सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्याला आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यापूर्वी यापूर्वी जून महिन्यात जळगाव जिल्ह्याकडे मान्सूनने पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला होता. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीलपासून जिल्ह्यात पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत.