जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । देशभरात सध्या महागाईचा भडका उडाला असून पेट्रोल, डिझेलचे दर कमी होऊन पुन्हा वाढत आहे. १२० पर्यंत पोहचलेले पेट्रोल, डिझेलचे दर सरकारने कर कपात केल्यावर कमी झाले होते. केंद्रानंतर काही राज्यांनी देखील कर कपात केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, पुन्हा काही पैसे करीत करीत पेट्रोलचे दर महाराष्ट्रात ११० च्या पुढे पोहचले आहेत. राज्यात पेट्रोल अजूनही १०० पार असले तरी देशातील अनेक शहरात विशेषतः भाजप शासित राज्यांमध्ये पेट्रोलचे दर १०० च्या आत आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज सलग 50 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढतच आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढ-उतार सुरू असताना देखील देशात गेल्या 50 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मात्र यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. मार्जीनमध्ये घट झाली आहे. त्यामुळे येत्या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आज सोमवारी जाहीर झालेल्या नवीन दरानुसार जळगावात पेट्रोल 112.19 रु. प्रति लिटर तर डिझेल 97.34 रु.प्रति लिटर पर्यंत विकले जात आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.92 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.73 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.97 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 98.89 रुपये एवढा आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.54 इतका आहे. ठाण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.78 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.25 रुपये इतका आहे.
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने होरपळून निघणाऱ्या जनतेला मे महिन्यात केंद्र सरकारने दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol Diesel) अबकारी कर (Tax) कमी केला. त्यामुळे पेट्रोल 9.50 रुपयाने तर डिझेलचे दर 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्रापाठोपाठ आता महाराष्ट्रातील ठाकरे सरकरने देखील पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित कर (VAT) कमी केला होता. राज्य शासनाने 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली होती.. शासनाने कर कपात केली तरी प्रत्यक्षात मात्र दर काही कमी झाले नव्हते. सध्या राज्यात ११० च्या पुढे पेट्रोल आणि ९७ च्या पुढे डिझेल दर पाहावयास मिळत आहे.
देशातील काही शहरांमध्ये आजही पेट्रोल १०० च्या आत असून डिझेलचे दर ९० रुपयांच्या आत आहेत. देशात आग्रा ९६.३६, अहमदाबाद ९६.४२, प्रयागराज ९६.६५, चंदीगढ ९६.२०, देहरादून ९५.१०, दिल्ली ९६.७२ असे १०० च्या आत दर आहेत. तसेच बंगळुरू १०१.९४, भुवनेश्वर १०३.१९, चेन्नई १०२.६३ असे १०० च्या जवळपास असलेले प्रति लीटर दर आहेत. डिझेल आग्रा ८९.५३, प्रयागराज ८९.८५, बंगळुरू ८७.८९, चंदीगढ ८४.२६, दिल्ली ८९.६२, देहरादून ९०.१२ असे दर आहेत. तसेच अहमदाबाद ९२.१७, भुवनेश्वर ९४.७६, चेन्नई ९४.२४ कोईम्बतूर ९४.७७ असे प्रति लीटर दर आहेत. देशातील आणखी काही शहरांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर १०० च्या आत असल्याने महाराष्ट्रात शिंदे-भाजप सरकारकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. लवकरच मोठी करकपात होऊन दर कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.