जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नंतर ओळख वाढवून विवाह करेल, अशी बतावणी करून 29 वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत एका विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवतीने दिलेल्या फियादीवरून सावदा येथील रेल्वे स्टेशन प्रबंधक अंकुश किरण मोरे (रा.गणेश कॉलनी, मरीमाता मंदीरामागे, भुसावळ) याच्याविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. 31 मार्च 2018 या दिवशी सायंकाळी पाच वाजता लोणारी हॉलजवळ बोलावून तेथून त्याच्या घरी नेत आरोपीने अत्याचार केला व नंतर लग्नाबाबत विचारणा केली असता त्यास आरोपी मोरे याने नकार दिला. याबाबत युवतीने रविवारी शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहे.