जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । चोपडा-शिरपूर रस्त्यावरील ओंकार हॉटेलात ग्राहकाच्या वजनाने खुर्ची तुटल्यानंतर बिलावरुन झालेल्या वादात हॉटेल मालकाने जादा बिलाची आकारणी करुन शिवीगाळ व सुरीने दुखापत करत ग्राहकाच्या खिशातील रक्कम सक्तीने काढून घेतल्याची घटना घडली आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपक सखाराम कोळी यांनी पोलिसांत फिर्याद दिली. कोळी व त्याचा मित्र चोपडा – शिरपूर रस्त्यावरील हॉटेल ओंकार येथे जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी दिपकच्या वजनाने खुर्ची तुटल्यानंतर वाद झाला. हॉटेल मालक लोकेश रतीलाल बाविस्कर याने 2 हजार 200 रुपयांचे बिल दिपक कोळी यास मागीतले. त्यावर ग्राहक दिपक याने 1 हजार 900 रुपये देण्याची तयारी दर्शवली. दरम्यान झालेल्या वादात हॉटेलवरील आकाश जळोदकर याने शिवीगाळ करत किचनमधील सुरी आणली. त्या सुरीने त्याने दिपकच्या डोक्यावर मारुन दुखापत केली.
दरम्यान हॉटेलवरील नरेंद्र कोळी याने दिपकला धरुन ठेवले. लोकेश व आकाश या दोघांनी दिपकच्या पॅंटच्या खिशातून दहा हजार सक्तीने काढून घेतल्याचा दिपकने आरोप केला आहे. याप्रकरणी दिपक कोळी याने चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप निरीक्षक अमरसिंग वसावे पुढील तपास करत आहेत.