⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | विशेष | राष्ट्रपती निवडणुकीत मतदान कसे होते व मतांचे मूल्य कसे ठरते?

राष्ट्रपती निवडणुकीत मतदान कसे होते व मतांचे मूल्य कसे ठरते?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पदाची मुदत २४ जुलै रोजी संपुष्टात येणार असून, त्याआधी म्हणजेच १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. भाजप पुरस्कृत एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना रिंगणात उतरवले आहे तर युपीएतर्फे यशवंत सिन्हा मैदानात आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरुन देशात राजकीय घडामोडींना वेग आला असल्याने राष्ट्रपती पदाची निवडणूक कशी होते?, निवडणुकीसाठी मतदान कोण करु शकतो?, जिंकण्यासाठी मॅजिक फिगर काय आहे? असे असंख्य प्रश्‍न सर्वसामान्यांना पडत आहेत. याकरिता राष्ट्रपती पदाची निवडणूक कशी होते हे आपण जाणून घेणार आहोत. (Indian President Election Process)

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण मतदार किती?
राष्ट्रपतीपदाकरिता खासदार आणि आमदार मतदान करतात. (विधान परिषद आमदारांना मतदानाचा अधिकार नसतो.) राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी ७६७ खासदार (५४० लोकसभा, २२७ राज्यसभा) आणि एकूण ४०३३ आमदार मतदान करतील. प्रत्येकी एका खासदाराच्या मताचं मूल्य ७०० इतकं आहे. म्हणजेच एकूण मतांचं मूल्य ३,१३,६०० आहे. तर ४०३३ आमदारांचं मतमूल्य ५,४३,२३१ इतकं आहे. अशा प्रकारे निवडणुकीसाठी एकूण मतमूल्य १०,८०,१३१ इतकं असतं. या निवडणुकीत जिंकण्यासाठी ५० टक्के म्हणजेच ५,४०,०६५ पेक्षा जास्त मत आवश्यक आहेत.

खासदारांच्या मतांचे मूल्य कसे ठरते?
लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचे मूल्य हे ७०० आहे. हे मूल्य एकूण विधानसभा आमदारांची मते भागिले एकूण खासदारांची संख्या या आधारे निश्चित केले जाते. आमदारांची एकूण मते ही ५,४३,२३१ आहेत. या संख्येला लोकसभा व राज्यसभेचे एकूण खासदार ७६७ याने भागले जाते. त्यातून खासदारांच्या एका मताचे मूल्य ७०० निश्चित करण्यात आले.

राज्यातील आमदारांच्या मतांचे मूल्य कसे ठरते?
महाराष्ट्रात १९७१च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या व त्याला एकूण विधानसभा सदस्यांच्या संख्येने भागले जाते. त्यातून येणारी सख्या ही एका मतांचे मूल्य मानले जाते. १९७१च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ५ कोटी चार लाख १२ हजार २३५ होती. या संख्येला २८८ ने भागले जाते. त्यातून एका मताचे मूल्य हे १७५ होते. एकूण २८८ आमदार गुणिले १७५ अशी पद्धतीने राज्यातील आमदारांची एकूण मते ही ५०,४०० होतात.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.