⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | सरकारी योजना | उच्चशिक्षित तरूण शेतकऱ्यास मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ठरली आधार

उच्चशिक्षित तरूण शेतकऱ्यास मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ठरली आधार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । घरची वडिलोपार्जित १५ एकर जमीन…पाण्याची चोवीस तास मुबलकता ; मात्र वीजेच्या अनियमितेमुळे शेती करणे कष्टप्रद… अशातच शासनाच्या मुख्यमंत्री सौर पंप योजनेचा (Mukhyamantri Solar Krishi Pump Yojana) लाभ मिळाला आणि ऊस शेतीला संजीवनी मिळाली असून उसाच्या फडात बसविलेल्या सौर संचामुळे १२ एकर शेती बहरून आली.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळ येथील उच्च पदवीधारक तरूण शेतकरी शुभम उपासनी यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये वडिलांच्या नावावर शासनाच्या मुख्यमंत्री सौर पंप योजनेत अर्ज केला. या योजनेत त्यांची निवड होऊन त्यांच्या शेतात ऑक्टोबर २०२१ मध्ये साडेसात अश्व शक्तीचा कृषी सोलर वॉटर पंप बसविण्यात आला. सोलर पंप बसण्यापूर्वी ऊस शेती करतांना कसरत करावी लागत होती. वीजेच्या अनियमितेमुळे उसाला पाणी देतांना तारांबळ होत होती. कधी कधी तांत्रिक कारणांमुळे आठ-दहा दिवस विद्युतपुरवठा खंडित झाल्याने मोठे नुकसान व्हायचे. आता मात्र १२ एकर ऊस शेताला सोलर पंपाद्वारे पाणी देणे सोयीचे, सहज साध्य होत आहे. त्यामुळे उसाची शेती करणे फायद्याचे ठरत आहे. असे शुभम उपासनी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर सोलर पंप दिला जातो. या पंपाची खुल्या बाजारात साधारणत: चार ते साडेचार लाख रूपये किंमत आहे. शुभम उपासनी यांनी यासाठी १० टक्के रक्कमेचा भरणा केला. त्यातून त्यांना सोलर (सौर) संच मिळाला. शक्ती सोलर कंपनीच्या ह्या संचाला साडेसात अश्वशक्तीचा पंप जोडण्यात आला. सध्या सकाळी साडेआठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विनाअडथळा हा पंप सुरू आहे. सध्या दिवसाला दीड एकर उसाच्या क्षेत्राचे सिंचन होते. सोलर पंप संच मिळवून देण्यासाठी शुभमला महावितरणचे सहायक अभियंता श्रीकांत सोनवणे, विठ्ठल हारक, बाळू घोडे, संजय गवारी , सचिन पाटील यांची मदत झाली.

शुभम स्वत: उच्च विद्याविभुषीत आहे. बी.टेक (फूड टेक्नोलॉजी) मध्ये केल्यानंतर त्यांनी एम.बी.ए (मॉर्केटिंग) केले आहे. वडिल सतीश उपासनी खासगी अनुदानित संस्थेत लिपिक आहेत. घरी आजोबा, आई, बहिण व पत्नी असा परिवार आहे. घरातील एकुलता एक मुलगा असल्यामुळे संपूर्ण शेतीची जबाबदारी शुभम वर आहे. शेतीच्या कामात वडिल व आजोबांचे त्याला नेहमी मार्गदर्शन मिळत आहे.

शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय म्हणून गायींचा गोठा ही शुभमने उभा केला आहे. सध्या त्यांच्याकडे डांगी, जर्सी व गीर गायी आहेत. यातून दूग्ध उत्पादनासोबतच शेणखत उपलब्ध होते. या शेणखताच्या माध्यमातून सेंद्रीय पध्दतीने शेती करणे शक्य होत आहे. भविष्यात पॉली हाऊसच्या माध्यमातून पीक उत्पादन घेण्यावर भर देणार आहे. तसेच सूक्ष्म सिंचन, सेंद्रीय खत व कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करत आधुनिक पध्दतीने शेती केली तर शेती निश्चितच फायदेशीर ठरेल.असे ही शुभम उपासनी याने सांगितले.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त सध्या राज्यभर विविध शासकीय उपक्रम राबविले जात आहेत. नाशिक विभागात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या कुशब मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या विविध योजना व उपक्रम यांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.