⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | राज ठाकरे यांचे ट्विट… त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो!

राज ठाकरे यांचे ट्विट… त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । राज्याचे मविआ सरकार कोसळले असून शिवसेनेतील ४० आमदार फुटल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना धोक्यात आल्याचे सांगत दोन्ही भावांनी एकत्र येण्याची हीच वेळ असल्याचे मत नागरिक व्यक्त्त करीत होते. गेल्या दहा दिवसापासून राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्यापासून लांब असलेले राज ठाकरे यांनी आज एक ट्विट केले असून कुणाचेही नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याचे म्हटले जात आहे. राज ठाकरे यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजीत ते ट्विट केले आहे.

राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विधान मंडळात आज बोलाविण्यात आलेल्या अधिवेशनात बहुमत सिद्ध करावे लागणार होते. सध्याचे पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपचे पारडे जड आहे. दरम्यान, सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे सांगत राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. (Chief Minister Uddhav Thackeray resigned) उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर सरकार देखील कोसळले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासह आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.

विधान परिषद निवडणूक, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून झालेली बंडखोरी, आमदारांची पळवापळवी, सर्वोच्च न्यायालयातील कामकाज, बहुमत चाचणीची घोषणा, मुख्यमंत्रांचा राजीनामा या सर्व घडामोडीत मनसे प्रमुख राज ठाकरे हे शस्त्रक्रियेमुळे काहीसे लांब होते. विधान परिषद निवडणूक आटोपताच दुसऱ्या दिवशी राज ठाकरे हे शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाले. स्वतःच वेगळा गट स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले ३७ चे संख्याबळ गाठल्यावर शिंदे गट सक्रिय होताच राज ठाकरे यांनी ट्विट करीत ‘ऑपरेशन सक्सेस’ असे म्हटले होते. राज्यातील सत्तानाट्य आणि राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया हा निव्वळ योगायोग समजला जाऊ शकतो.

राज्यातील सरकार कोसळणार असल्याचे चिन्ह दिसू लागताच आणि बहुमत चाचणी रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यावर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फेसबुक लाईव्ह करीत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे गट सक्रिय झाला असून दोघांनी सत्ता स्थापनेची तयारी सुरु केली आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुपारी एक ट्विट करीत कुणाचेही नाव न घेता टोमणा लगावला आहे. ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी, एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो, असे म्हटले आहे.
हे देखील वाचा : Big Breaking : फडणवीस सरकारच्या मंत्रिपदाची यादी ‘लीक’?, वाचा कुणाला मिळणार संधी!

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे ट्विट म्हणजे, उद्धव ठाकरे यांना उपरोधक टोला समजला जात आहे. राज ठाकरे यांच्या ट्विटमुळे दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून येते. उद्या विधानमंडळात एकनाथ शिंदे गट मनसेत विलीन होणार किंवा इतर कोणता पर्याय निवडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.