जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२२ । बारमध्ये दारु पिऊन झाल्यानंतर बिल न भरता निघून जात असलेल्या तीन मद्यपी तरुणांना वेटरने बिल भरण्यासाठी हटकले. त्याचा रागात अनावर झाल्याने तिघांनी वेटरच्या डोक्यात फायटर मारल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात वेटरच्या डोक्यात आठ टाके पडले. शुक्रवारी दुपारी ४.०० वाजता ही घटना घडली. रात्री उशिरा जखमीने रुग्णालयात पोलिसांना फिर्याद दिली.
विकास गोकुळ पवार (वय ३२, रा. शाहुनगर) असे जखमी वेटरचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी शाहुनगरातील हॉटेल वुडलँड येथे तीन तरुण दारु पिण्यासाठी आले. दारु प्यायल्यानंतर त्यांनी वेटर विकास यांना बिल मागीतले. त्यानुसार विकासने बिल आणून दिले. परंतु, हे तरुण मद्याच्या नर्शत तर्रर झाले होते. बिल न देताच एकेक करुन ते हाॅटेलबाहेर पडू लागले. यामुळे विकासने त्यांना बिल भरण्याची विनंती केली. याचा राग आल्याने तिघांनी त्याला फायटरने मारहाण केली. त्यात ताे बेशुद्ध झाला होता. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर रात्री उशिरा शुद्ध आली. यानंतर रुग्णालयात त्याची फिर्याद घेतली.