जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । पाय घसरून तोल जाऊन विहिरीत पडल्याने शेत मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील चुंचाळे येथे उघडीस आली. डिगंबर सदु कोळी (वय ६२) असे मृत शेत मजुराचे नाव आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डिगंबर सदु कोळी (वय ६२) हे चुंचाळे शिवारातील शेत गट क्र. ३ मधील शेतात काम करत होते. त्यावेळी डिगंबर कोळी पाय घसरून तोल जावुन ते विहिरीत पडले. हा प्रकार शेतात उपस्थित शेतमजुरांच्या निदर्शनास येतात त्यांनी तातडीने विहिरीजवळ धाव घेतली. मात्र डिगंबर कोळी यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तातडीने नागरिकांना माहिती देण्यात आली, ग्रामस्थांच्या मदतीने डिगंबर कोळी यांचा मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन करीता आणण्यात आला.
याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात पिंटू उर्फ भगवान मुरलीधर कोळी यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अजित शेख यांच्यासह हवलदार नरेंद्र बागुले हे करीत आहे. मयत डिगंबर कोळी यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.