⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

बैलगाडीत बसलेल्या शेतमजूर महिलेसोबत घडलं विपरीत ; जळगावातील धक्कादायक घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२४ । जळगाव तालुक्यातील भादली येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. बैलगाडीत बसलेल्या शेतमजूर महिलेच्या अंगावरील शाल चाकात अडकल्याने ती ओढली जाऊन गळ्याभोवती फास बसला. यात जखमी होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. जानुबाई भायला बारेला (वय ३२) असं मृत महिलेचं नाव असून याबाबत नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, जानुबाई भायला बारेला ही मध्य प्रदेशातील गोंट्या पांचाळ येथील मूळ रहिवाशी असून ती कामासाठी भादली (ता. जळगाव) येथे वास्तव्यास होती. मोल मजुरी करून त्या व त्यांचा परिवाराचा उदरनिर्वाह सुरु होता. दरम्यान २४ फेब्रुवारीला दुपारी बारा वाजेच्या सुमारास भादलीच्या शेतशिवारात बैलगाडीने परिवारासह कामाला जात होते. त्यांच्या अंगावरील शालीचा काही भाग बैलगाडीच्या चाकात आला. बैलगाडीच्या वेगाने त्यांच्या मानेला जोरात गळफास बसल्याने महिला जबर जखमी झाली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ गाडी थांबवून त्यांना पाणी पाजले. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

नशिराबाद पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर घटनेची माहिती घेत पंचनामा केला. महिलेच्या अचानक मृत्यूने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला दीर शांतीराम बारेला यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.