जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२२ । मागील काही महिन्यात गॅस सिलेंडरचे दर भरमसाठ वाढले आहे. वाढत्या गॅस दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यात आता नवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेणे देखील महाग झाले आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी उद्यापासून म्हणजेच गुरुवार, १६ जूनपासून घरगुती गॅस कनेक्शन महाग करण्याचा निर्णय घेतला आहे.
घरगुती एलपीजी कनेक्शन अंतर्गत, कंपन्यांनी 14.2 किलो सिलेंडरची सुरक्षा रक्कम 750 रुपयांनी वाढवली आहे. पाच किलोच्या सिलेंडरसाठी ३५० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. केवळ एलपीजी सिलिंडरच नाही तर पेट्रोलियम कंपन्यांनीही गॅस रेग्युलेटरच्या किमती वाढवल्या आहेत. नवीन गॅस रेग्युलेटरसाठी आणखी 100 रुपये मोजावे लागतील.
किंमत इतकी जास्त
आता नवीन किचन कनेक्शन घेतल्यावर तुम्हाला 2,200 रुपये द्यावे लागतील. तर यापूर्वी 1450 रुपये मोजावे लागत होते. म्हणजेच आता सिलिंडरची सुरक्षा म्हणून ७५० रुपये अधिक जमा करावे लागणार आहेत. याशिवाय रेग्युलेटरसाठी 250, पासबुकसाठी 25 आणि पाईपसाठी 150 रुपये वेगळे द्यावे लागतील. त्यानुसार, पहिल्यांदा गॅस सिलिंडर कनेक्शन आणि पहिल्या सिलिंडरसाठी ग्राहकाला एकूण 3,690 रुपये मोजावे लागणार आहेत. जर ग्राहकाने दोन सिलिंडर घेतले तर त्याला सुरक्षा म्हणून 4400 रुपये द्यावे लागतील.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना धक्का
पाच किलोच्या सिलेंडरच्या सुरक्षेसाठी आता जास्त पैसे जमा करावे लागणार आहेत. पाच किलोच्या सिलेंडरच्या सुरक्षेसाठी आता 800 रुपयांऐवजी 1150 रुपये मोजावे लागणार आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत एलपीजी सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकांनाही धक्का बसणार आहे. जर या ग्राहकांनी त्यांच्या कनेक्शनवर सिलिंडरच्या दुप्पट म्हणजे दुसरा सिलिंडर घेतला, तर त्यांना वाढीव सुरक्षा रक्कम भरावी लागेल. नवीन कनेक्शन रेग्युलेटरसाठी ग्राहकांना आता 150 रुपयांऐवजी 250 रुपये खर्च करावे लागतील.
एका सिलिंडरच्या कनेक्शनसाठी 3690 रुपये मोजावे लागणार
एक सिलिंडर कनेक्शनची नवीन किंमत आता 3690 रुपये असेल. गॅस स्टोव्हचे पैसे वेगळे द्यावे लागतील. मात्र, स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनच्या खर्चामुळे सर्वसामान्यांना धक्का बसणार आहे. एलपीजीच्या वाढत्या किमतींमध्ये कनेक्शनच्या किमतीमुळे सर्वसामान्यांचा खिसा बुडणार आहे.