जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । दहिगाव च्या एका शेतकऱ्याने मुक्ताईनगरातील कारखान्यास वारंवार विनंती करूनही ऊसाची तोडणी न झाल्याने, कारखान्याचा निषेध करत शेतकऱ्याने दोन एकर ऊसात गुरे सोडली. वर्षभर मेहनत करून मुक्ताईनगर कारखान्याकडे ऊस नोंदवूनही तोड झाली नाही. म्हणुन हताश झालेल्या शेतकऱ्याने हा निर्णय घेतला.
यावल तालुक्यातील दहिगाव येथील राजेंद्र नीळकंठ महाजन व नीळकंठ महाजन यांनी त्यांच्या गट क्रमांक ३१/१ मधील दोन एकर क्षेत्रात ऊस लावला होता. तो ऊस त्यांनी मुक्ताईनगर साखर कारखान्यात नोंदवला होता. वर्षभर ऊसाची योग्य काळजी घेत त्यांनी पीक तयार केले. मात्र, कारखान्याने ऊसाची तोडणी केली नाही. १२ महिने झाले तरी ऊसाची तोडणी न झाल्याने शेतकऱ्यांनी वारंवार कारखान्याला विनंती केली. त्यामुळे ऊसाला १५ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला. तसेच आगामी खरीप हंगामासाठी शेत मशागतीसाठी मोकळे करणे गरजेचे होते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मुक्ताईनगर साखर कारखान्याचा निषेध करत, उभ्या उसात गुरे सोडली. फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे, यावल – रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस मुक्ताईनगर येथील साखर कारखान्याकडे नोंदवला जातो. मात्र, कारखान्याकडून वेळेत ऊसाची तोडणी होत नसल्याने, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.