⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | भडगाव | विवाहाला विरोध, हळदीच्या कार्यक्रमात नातेवाईकांचा गोंधळ, वधू-वरावर जीवघेणा हल्ला

विवाहाला विरोध, हळदीच्या कार्यक्रमात नातेवाईकांचा गोंधळ, वधू-वरावर जीवघेणा हल्ला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत लग्न करत असल्याच्या कारणावरुन जमावाने थेट हळदीच्या दिवशी मंडपात घुसून वधू आणि वरावर चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भडगाव तालुक्यातील देव्हारी या गावात ही भयंकर घटना घडलीय. इतकंच नाही तर घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या वाहनावरही जमावाने दगडफेक केली, या घटनेत नवरदेव जखमी झाला आहे.

भडगाव तालुक्यातील देव्हारी या गावी मंगळवारी लग्न होते. त्यानिमित्ताने सोमवारी रात्री हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच गावातील संशयित अनिल सोनवणे, सुखदेव उर्फ अप्पा देवाराम सोनवणे, समाधान सोनवणे, दिलीप गायकवाड आणि योगेश सोनवणे यांच्यासह अनोळखी ३० महिला आणिव पुरुषांचा जमाव हळदीच्या मंडपात घुसला. त्यांनी वधूला जातीबाबत विचारणा केली. त्यानंतर मिळालेल्या उत्तराने संतप्त होत जमावाने हळद लागलेल्या वधू-वरावर हल्ला चढवला. सर्व हल्लेखोर हे वराचे नातेवाईक असल्याची चर्चा आहे.

जमावामधील अनिल सोनवणे याने चॉपरने नवरदेवाच्या गळ्यावर वार केला. यात नवरदेव गंभीर जखमी झाला. मंडप, घरातील सर्व साहित्याचीही जमावाकडून तोडफोड करण्यात आली. हा गोंधळ सुरू असतानाच तेथे भडगाव पोलीस पोहोचले.

घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्न केला. तेव्हा जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करुन वाहनाच्या काचा फोडल्या. या प्रकरणी वधूच्या फिर्यादीवरुन भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह