आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची पुन्हा धडक कारवाई : अजून एक कंपनी सील
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचा कारवाईचा धडाका सुरूच आहे. आज आयुक्तांनी पुन्हा एमआयडीसी भागातील प्लास्टिक पिशवी बनविणारी कंपनीतील जवळपास ५ ते ६ टन माल जप्त केला व कंपनी सील केली. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सलग ३ मोठ्या कारवाया केल्या.
दि. ६ जून सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान एमआयडीसी मधील सेक्टर व्ही ११३ येथील प्लास्टीक पिशव्या बनविणारी नेहा इंडस्ट्रीज या कंपनीची आयुक्त डॉ. विद्या गायकवाड व मनपा कर्मचारी यांच्या पथकाने अचानक तपासणी केली. या तपासणी जवळपास ५ ते ६ टन वजनाच्या ५० मॅक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या किराणा प्लास्टिक बॅग तयार करतांना आढळून आले.
दरम्यान, कंपनी मालकाने मनपा पथकाशी हुज्जत घातली. वाद वाढत गेल्याने प्लॅस्टिक बॅग मॅक्रोनची जाडी तपासण्या कामी एमपीसीबी अधिकारी मनीष महाजन व ठाकूर यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी केलेल्या तपासणीदरम्यान सदर प्लास्टिक कॅरीबॅग २५ ते ३० मॅक्रोन जाडीच्या आढळून आल्यात. नेहा इंडस्ट्रीज चे मालक पराग लुंकड यांच्यावर १० हजारांची दंडात्मक कारवाई करत कंपनीला सिल करण्यात आले आहे. ही कारवाई आयुक्त डॉ. विद्या गायकवाड व एमपीसीबीचे अधिकारी मनिष महाजन व श्री ठाकूर यांच्या उपस्थीतीत अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकुर ,आरोग्य निरीक्षक जितेंद्र किरंगे व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या पथकाने केली.