जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२२ । जळगाव शहर मनपात शिवसेनेचे राज्य असून तरीही शिवसेनेच्या चार दिग्गज नगरसेवकांचा प्रभाग असलेल्या प्रभाग ५ मध्ये तुटलेल्या गटारीच्या दुरुस्तीचे काम अनेक महिन्यांपासून होत नसल्याने नागरिक विचारात पडले आहे. दिग्गज नगरसेवकच काय तर माजी उपमहापौर आणि दोन माजी नगरसेवकांची गल्ली असून देखील ते काम अद्याप रखडलेले आहे. नागरिकांनी केलेल्या पाठपुराव्या नुसार गटारीचे काम कुणीतरी एका नगरसेवकाने घेतले असून त्यांनी ते सुरु केल्यास होऊ शकते असे उत्तर नागरिकांना मिळाले.
जळगाव शहर मनपा अंतर्गत विकासकामांसाठी गेल्या काही महिन्यात मोठा निधी उपलब्ध झाला आहे. काही कामांना सुरुवात झाली तर काही कामांना मंजुरी देखील मिळाली आहे. मुख्य रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली असून काही प्रभागात विशेषतः प्रभाग ५ मध्ये गटारींची कामे सुरु आहेत. जळगाव शहरातील सर्वात मोठा प्रभाग म्हणजे प्रभाग ५ आहे. शनिपेठपासून सुरु होऊन शाहूनगर व्हाया गांधीनगर जाणाऱ्या या प्रभागाचे नगरसेवक देखील दिग्गज आहेत. प्रभाग ५ चे नगरसेवक नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, राखी सोनवणे आणि ज्योती तायडे हे आहेत.
प्रभाग ५ मधील शनीमंदिरासमोरील गल्लीत माजी उपमहापौर अनिल वाणी, माजी नगरसेवक सुनील माळी, प्रशांत पाटील, प्रभाग समिती सदस्य जगदीश नेवे हे राहतात. काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरु असताना गटारीवरील ढापा तुटल्याने मोठा खड्डा पडला होता. त्वरित दुरुस्ती न केल्याने खड्डा वाढतच गेला असून जवळपास अर्धी गटार तुटून रहदारीसाठी रस्ता अर्धाच राहिला आहे. गटारीचे काम करण्यासाठी नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केला तरी देखील अद्याप काम मार्गी लागलेले नाही. परिसरातील स्वच्छता देखील बऱ्याच दिवसांनी होत असल्याने नागरिकांची नेहमीच ओरड असते.
दिग्गज नगरसेवकांचा प्रभाग आणि त्यात माजी नगरसेवकांच्या गल्लीतीलच काम होत नसेल तरी सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान, काही नागरिकांनी केलेल्या चौकशीनुसार प्रभाग ५ मधील गटारींचे काम एका विद्यमान नगरसेवकाने घेतले असून सध्या ते संथगतीने सुरु आहे. सध्या नगरसेवक विष्णू भंगाळे यांच्या घराकडील आणि रोझ गार्डन, हौसिंग सोसायटी परिसरातील गटारीचे काम सुरु आहे. तुटलेल्या गटारीमुळे दररोज विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. एखादा मोठा अपघात होण्याची देखील शक्यता असून लवकरात लवकर दुरुस्ती किंवा नवीन गटार बांधण्याचे काम होण्याची मागणी होत आहे.