जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । किरकोळ कारणावरुन सूरत शहरातील हद्दपार गुंडासह चिक्या व इतर दोन जणांनी, रविवारी रात्री जामनेर तालुक्यातील पहूर येथील तरुणावर चाकूने पोटात व हातावर वार केले होते. यात सतीश पांढरे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. तर वाद सोडवण्यासाठी गेलेला अंडे व्यावसायिक राहुल भोंडे याच्या पाठीवर संशयित शुभम उर्फ टायगरने चाकूने वार केला होता. दोघा जखमींवर पहूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेनंतर पोलिसांनी दोन संशयितांना सोमवारी अटक केली. तसेच त्यांना चोप देत त्यांची गावातून धिंड काढली.
पसार संशयितांचा शोध सुरू
रविवारी रात्री नऊच्या सुमारास सतीष कडुबा पांढरे (वय ३५) हा नाना ऑम्लेट सेंटरवर गेला होता. यावेळी सूरत शहरातील तडीपार गुंड शुभम उर्फ टायगर उर्फ झिपऱ्या रमेश पाटील, त्याचा मावस भाऊ रोहित उर्फ चिक्या पाटील, त्यांचा मामा बंडू एकनाथ पाटील व एक अज्ञात संशयित हे चौघे ऑ मलेट सेंटरवर आले. त्यावेळी संशयित चिक्याने चाकूने सतीश पांढरे याच्या पोटात वार केले. यावेळी बंडू व एकाने (नाव माहित नाही) संशयित सतिशला पकडून ठेवले होते. यावेळी ऑमलेट सेंटरचालक राहुल भोंडे त्यांना सोडवण्यासाठी गेला असता, संशयित शुभम उर्फ टायगरने त्याच्याही पाठीवर चाकूने वार केले. या घटनेनंतर चौघे संशयित पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी घटनास्थळ गाठले. याप्रकरणी सतीश पांढरे याचा भाऊ विलास पांढरे याच्या फिर्यादीवरुन चौघांवर गुन्हा दाखल झाला. अन्य दोन पसार संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.