⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

मनपा विशेष : जळगावातील असुविधांवरून प्रशासन धारेवर, नागरिकांना दिले आश्वासन

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२२ । शहरात होत असलेला दृषित पाणी पुरवठा, होत नसलेली साफसफाई, रस्त्यांची निकृष्ठ कामे, अमृतची रखडलेली कामे व रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश दिलेले असतांना देखील मक्तेदारांकडून कामे सुरु होत नसल्यामुळे महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. यावर प्रशासनाकडून प्रलंबित विषय बैठका घेवून मार्गी लावण्यात येतील आश्वासन देण्यात आले.

महापौर जयश्री महाजन यांच्या आध्यक्षतेखाली सोमवारी मनपाच्या सभागृहात महासभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगरसचिव सुनिल गोराणे उपस्थित होते.

सभेत माजी महापौर सदाशिव ढेकळे यांनी डी-मार्ट ते ईच्छादेवी चौक रस्त्याच्या दुरुस्ती व अमृतचे नळ कनेक्शन दिले जात नाही, त्यावरुन अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच राजेंद्र घुगे पाटील यांनी देखील स्मशानभूमी, डी-मार्ट रोडवरुन संताप व्यक्त केला, नगरसेवक इबा पटेल, विरण खडके, सरिता माळी, ॲड. दिलीप पोकळे, चेतन सनकत आदी नगरसेवकांनी विविध विषयांवरुन अधिकाऱ्यांच्या कामाकाजाविषयी नाराजी व्यक्त केली. तसेच दृषित पाण्याच्या मुद्द्यावरुन नगरसेवका पार्वताबाई भिल, डॉ.चंद्रशेखर पाटील यांच्यासह बहुतांश नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच घेरले होते. दरम्यान, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी तातडीने बैठका घेवून चर्चाकरुन विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही दिली.

 दरम्यान, महापौर व विरोधी पक्षनेते यांच्या प्रभागातील चेनलिंग फिनिशिंग, पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाच्या प्रस्तावावरुन नगरसेवक नितीन लढ्ढा म्हणाले की, शहरातील प्राथमिकता व गरज लक्षात घेऊन कामांना मंजुरी दिली पाहिजे, चेनलिंग फिनिशिंग, नाला संरक्षण भिंत, काँक्रिटीकरणाच्या कामांचा कोणीही आग्रह धरु नये, अशी सुचना देखील त्यांनी केली. तसेच आमदारांना देखील अशाच स्वरुपाची विनंती आपण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नगरसेवक नवनाथ दारकुंडे म्हणाले की, शहरातील शिवाजी नगर पुलाचे काम सुरु आहे, परंतु या पुलावर सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. पुलावर पथ दिवे बसविण्यात आलेले नाही, पुलावर चढण्यासाठी पादचाऱ्यांकरीता जिन्याची व्यवस्था नाही, यासाठी महापालिकेचे काय नियोजन आहे, असा प्रश्न दारकुंडे यांनी उपस्थित केला