जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । मध्यप्रदेशच्या उज्जैन येथील ‘दुर्लभ कश्यप’च्या गुन्हेगारी जगताचा तो देशात फेमस होण्यापूर्वीच अंत झाला. आज दुर्लभ जगात नसला तरी त्याच्या नावाने कितीतरी गॅंग देशभरात अस्तित्वात आहेत. जगाच्या पाठीवर देशातील टॉप मोस्ट वॉन्टेडमध्ये नाव येणारा दाऊद सर्वांना ठाऊक आहे परंतु शहिद भगतसिंग यांना आदर्श मानणारा, अवघ्या २९ वर्षाचा गोरापान तरुण आज देशातील सर्वात मोठा आणि श्रीमंत गँगस्टर असेल यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर तो पुन्हा चर्चेत आला आहे. कारागृहात राहून सुपारी घेणे, गॅंग ऑपरेट करणे, एखाद्याचा खून करणे इतकंच काय तर फेसबुक पोस्टद्वारे कबुली देणारा हा कुख्यात गँगस्टर म्हणजे ‘लॉरेन्स बिष्णोई’. पोलीस पाल्य असलेल्या लॉरेन्सच्या गॅंगमध्ये आज ७०० वर शार्प शुटर असून फेसबुक, इंस्टाग्रामवर त्याच्या नावाने शेकडो अकाउंट आहेत. आजही लॉरेन्स दिल्लीच्या तिहार कारागृहात आहे.
पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याची दि.२९ मे रोजी सकाळी ३० गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली. हत्येच्या काही तासांनी लॉरेन्स बिष्णोई ग्रुपने जबाबदारी स्वीकारत अकाली दल नेता विक्की मिद्दुखेरा या मित्राच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच हत्त्येमागे कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी बरार याचा देखील यामागे हात असल्याचे समोर आले आहे. सलमान खानच्या हत्येची सुपारी घेतल्याच्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोई गॅंग चर्चेत आली आहे. गॅंगचा म्होरक्या सध्या दिल्लीच्या तिहार कारागृहात असून त्याच्या गुन्हेगारी विश्वाची सुरुवात केव्हा आणि कशी झाली याची माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत.
पोलीस पाल्य, दिसायला स्मार्ट, खेळात हुशार आणि ख्रिस्ती नाव
‘लॉरेन्स’ तसे पाहिले तर लॉरेन्स नाव ख्रिस्ती नाव आहे. २२ फेब्रुवारी १९९२ रोजी पंजाबच्या फाजलिका शहरात लॉरेन्सचा जन्म झाला. जेव्हा लॉरेन्सचा जन्म झाला तेव्हा तो दिसायला दुधासारखा पांढरा शुभ्र होता. ख्रिश्चन धर्मात लॉरेन्सचा अर्थ पांढरा चमकणारा असा होता. लॉरेन्स तसाच असल्याने त्याच्या आईने त्याचे ते नाव ठेवले. लॉरेन्सचे वडील लाविन्दर सिंग हे पोलीस दलात होते तर आई देखील शिक्षीत होती.घरी गडगंज संपत्ती, दिसायला स्मार्ट आणि खेळात अग्रेसर असल्याने भविष्यात आपला मुल देखील चमकणार असा विश्वास लॉरेन्सच्या कुटुंबियांना होता. लॉरेन्सचे शालेय शिक्षण फाजालिकाच्या शाळेतच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी लॉरेन्स चंदिगढच्या डी.वी.कॉलेजला आणि तिथून पुढे त्याचे आयुष्यच बदलले.
महाविद्यालयीन निवडणूक, संघटनेची स्थापना, दोन गटातील वादातून गोळीबार
लहानपणापासून दिसायला स्मार्ट, कुटुंबियांचा लाडका, सर्व हौस पूर्ण केली जात असल्याने लॉरेन्सचे राहणीमान देखील उत्तम होते. शहीद भगतसिंग त्याचे आदर्श, गरिबांना आणि निरपराधांना त्रास द्यायचा नाही ही त्याची तत्वे. चंदीगडला महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन निवडणूक आल्या. शरीरयष्टी उत्तम असल्याने मित्रांनी निवडणुकीसाठी लॉरेन्सला तयार केले. लहानपणापासून जे करायचे ते नियोजनबद्ध आणि मनापासून करायचे असे लॉरेन्सचे काम असल्याने त्याने निवडणुकीसाठी एक संघटन उभे केले. पंजाब विद्यापीठाची निवडणूक लढवायची होती म्हणून त्यांनी आधी एक गट तयार केला. स्टूडेंट ऑर्गनाइजेशन ऑफ पंजाब यूनिवर्सिटी म्हणजेच सोपू (SOPU) असे लॉरेन्सच्या पहिल्या संघटनेचे नाव होते. संस्थेची उभारणी करणारे आज कारागृहात असले तरी संघटना मात्र सुरु आहे.
हेही वाचा : जळगावच्या टिनेजर्स, तरुणाईचा रोल मॉडेल ‘दुर्लभ कश्यप’
निवडणुकीसाठी उत्तम नियोजन केले. विजय आपलाच होणार असा ठाम विश्वास असताना निकाल मात्र काही विपरीतच आला. निवडणुकीत लॉरेन्सचा पराभव झाला. हारण्याची सवय नसल्याने लॉरेन्सचा पारा चढला आणि त्याने बंदूक खरेदी केले. हाती बंदूक आल्यावर गुन्हेगारी जगत किती दूर आहे हे कुणालाही सांगता येत नाही, लॉरेन्सच्या बाबतीत नेमकेच ते घडले. फेब्रुवारी २०११ मध्ये लॉरेन्सचा सामना महाविद्यालयात विजयी झालेल्या उदय गटाशी झाला. दोन्ही गटात वाद झाला आणि संतापात असलेल्या लॉरेन्सने दुसऱ्या गटाच्या दिशेने गोळीबार केला. प्रकरण वाढले आणि लॉरेन्सवर गुन्हा दाखल झाला. फेब्रुवारी २०११ मध्ये लॉरेन्सच्या गुन्हेगारी जगताला सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत त्याचा गुन्हेगारीचा आलेख चढताच आहे.
जग्गू भगवानपुरीकडून शिकला, गुन्हेगारीत बाप झाला
लॉरेन्स आज गुन्हेगारी जगतात बाप मानला जात असला तरी असे म्हणतात कि त्याचा गुरु कुख्यात गुंड जग्गू भगवानपुरी हा होता. या गुंडाने लॉरेन्सला गुन्हेगारी जगाच्या त्या युक्त्या शिकवल्या, ज्यामुळे तो आज या काळ्या जगाचा मुकुट नसलेला राजा आहे. जग्गू भगवानपुरी पंजाबमधील भगवानपूरचा रहिवासी असून त्याला देशातील सर्वात श्रीमंत गुंड म्हटले जाते. आता जग्गूही दिल्लीच्या तिहार तुरुंगात कारागृहात बंद आहे. एक काळ असा होता की, पंजाबच्या राजकारणात आणि गुन्हेगारी जगात जग्गूचा दरारा तर होताच, पण त्याच्याशिवाय पान देखील हलत नव्हते. जग्गूच्या संपत्तीचा अंदाज बांधायचा म्हटले तर, काही वर्षांपूर्वी जग्गूकडून 2 कोटींची शस्त्रे जप्त करण्यात आली होती. लॉरेन्स आज इथवर पोहोचण्यात जग्गूचा मोठा वाटा आहे. त्याने जग्गूकडून पैशातून सत्ता मिळवण्याची कला शिकून घेतली आणि गुंड नरेश शेट्टी, संपत नेहरा आणि मृत सुखा या गुंडांशी हातमिळवणी करून शस्त्राच्या जोरावर खंडणीचे देशातील सर्वात मोठे नेटवर्क तयार केले. याच्या नेटवर्कमध्ये येऊन कला जाठेदी, रिव्हॉल्व्हर राणी या नावाने प्रसिद्ध असलेल्या लेडी डॉन अनुराधा चौधरी यांच्यासह अनेक गुंडांनी काळ्या दुनियेचे साम्राज्य निर्माण केले.
कारागृहातून चालते नेटवर्क, ७०० शार्प शूटर असतात कार्यरत
लॉरेन्सची दहशत हळूहळू करीत पंजाबपासून सुरु होत दिल्ली, राजस्थानपर्यंत पोहचली आहे. वयाच्या अवघ्या २९ पर्यंत त्याने गुन्ह्याची पन्नाशी ओलांडली असून अनेक राज्यात त्याचे नेटवर्क पोहचले आहे. लॉरेन्स बिष्णोई आज तुरुंगात असूनही देशातील अनेक राज्यांमध्ये त्यांचे ७०० हून अधिक शार्प शूटर सदैव तैनात असतात. लॉरेन्स बिष्णोई अत्यंत हुशार आणि चपळ वृत्तीचा आहे. कारागृहात राहून देखील तो मोबाईलद्वारे सतत संपर्कात असतो. त्याच्या एका इशाऱ्यावर त्याचे समर्थक केव्हाही, कुणाचाही गेम वाजवू शकतात. लॉरेन्स कारागृहाच्या बाहेर असताना जितका पोलिसांसाठी त्रासदायक असतो आज तुरुंगात असतानाही तो पोलिसांसाठी तेवढाच डोकेदुखी बनला आहे.
सलमान खानला मारण्यासाठी दिली होती सुपारी
सुपारी घेऊन खून करण्यात लॉरेन्स एक्स्पर्ट आहे. 5 जानेवारी 2018 रोजी लॉरेन्स बिष्णोईला राजस्थानच्या जोधपूर न्यायालयात आणण्यात आले होते. त्याचवेळी त्याने चित्रपट अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने केवळ धमकीच दिली नाही तर त्याचा सहकारी कुख्यात गुंड संपत नेहराला सलमान खानला मारण्यासाठी पाठवले होते. संपत महिनाभर मुंबईत लक्ष ठेवून होता. सकाळी सलमान खान सायकलवर बाहेर पडल्यानंतर त्याची हत्त्या करण्याचा कट होता मात्र कडेकोट बंदोबस्तामुळे संपत नेहराला यश मिळू शकले नाही. वास्तविक हा गुंड बिष्णोई समाजातील असल्याचे बोलले जात आहे. बिष्णोई समाज काळ्या हरणाची पूजा करतात आणि सलमान खानने काळवीटाची शिकार केली होती. त्यामुळेच लॉरेन्सने सलमान खानला मारण्याची सुपारी घेतल्याचे समजते.
शेकडो फेसबुक, इंस्टाग्राम आयडी, स्वतःच देतो गुन्ह्यांची माहिती
लॉरेन्स बिष्णोई हा गुन्हेगारीच्या जगात एकमेव असा गुंड आहे ज्याच्या नावावर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेकडो अकाउंट, पेजेस आणि इन्स्टा आयडी आहेत. तसेच त्याने महाविद्यालय काळात तयार केलेल्या सोपू संस्थेच्या नावाखाली अनेक फेसबुक पेजही आहेत. अल्पवयीन मुलांमध्ये जसा दुर्लभ कश्यप प्रसिद्ध आहे तसेच लॉरेन्स देखील प्रचलित आहे. लॉरेन्सचे फेसबुक पेजेस पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की, त्यांनी गुन्हेगारीच्या जगात अनेक खून केले असले तरी मुलींच्या छेडछाडीला किंवा कोणत्याही प्रकारच्या घटनेला ते उघडपणे विरोध करतात. जर कोणी असे केले तर तो त्याला सोडणार नाही, असे त्यात म्हटले आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, एक-दोन फेसबुक अकाऊंट हे लॉरेन्स स्वत: हाताळत असतो. बऱ्याच वेळा गुन्ह्यांची माहिती त्याने स्वतः फेसबुकद्वारे दिली आहे.
कारागृहात वापरतो मोबाईल, रेकी करून दोन नंबरवाल्यांकडून उकळतो खंडणी
पोलिसांच्या म्हणण्यानुसार लॉरेन्स बिष्णोई थेट प्रकारे कोणाकडूनही खंडणी मागत नाही. अवैध व्यवसाय करणाऱ्या मोठ्या माशांचे तो इंटरनेटवर संशोधन करतो. त्यानंतर आपल्या पोरांना पाठवून रेकी करतो व खंडणी मागतो किंवा सुपारी घेतो. तो नेहमी व्हाट्सअँप कॉलद्वारे धमक्या देत असतो. कारागृहात कितीही बंदोबस्त असला, तरी तो मोबाईल फोन कधी आणि कसा वापरतो, याचा शोध अद्यापही पोलिसांना लागलेला नाही. ट्रॅव्हल एजंट, हिरे व्यापारी, हॉस्पिटल मालक, गुटखा व्यापारी, चरस आणि ड्रग्ज व्यापारी, दारूचे व्यापारी आणि बडे रेस्टॉरंट मालक हे त्याचे लक्ष्य आहेत. त्यांना धमकावून तो खंडणी तर घेतोच पण त्याच्याशिवाय देशातील दुसरा गुंड त्याला त्रास देऊ शकत नाही असा दावाही करतो. एका माहितीनुसार लॉरेन्सची संपत्ती ७ कोटींपेक्षा अधिक असून त्यात ६० लाखांची शस्त्रे असल्याचा अंदाज आहे.