खुशखबर ! जिल्ह्यातील शाळांमध्ये लवकरच वाटली जाणार खिचडी
जळगाव लाईव्ह न्युज | २३ मे २०२२ | कोरोना काळात विद्यार्थ्यांना कोरोना होऊ नये म्हणून शाळा बंद असल्याने गेल्या अडीच वर्षापासून विद्यार्थ्यांना शाळेत मिळणारी खिचडी बंद होती. गेल्या सहा महिन्यापासून ऑफलाईन शाळा सुरू झाल्या. मात्र विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नव्हता. आता मात्र उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या की लगेचच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारा अंतर्गत खिचडी वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की , जळगाव जिल्ह्यात एकूण २ हजार २७५३ अनुदातीन शाळा आहेत. या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा पोषण आहार अतिशय महत्त्वाचा आहे. विद्यार्थी शिक्षणासोबतच शारीरिक दृष्ट्या परिपूर्ण हवे यासाठी शालेय पोषण आहार अतिशय महत्त्वाचा असतो. या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना हा पोषण आहार दिला जाणार आहे.
याचबरोबर जळगाव जिल्ह्यामध्ये कुपोषणाची संख्यादेखील वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात सरकार कोट्यावधी रुपये खर्च करूनही योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत पोषण आहार पोहोचत नाहीये. गर्भवती मातांना योग्य तितका आहार मिळत नसल्याने जिल्ह्यातील कुपोषणाची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात 900 हून अधिक बालके ही कुपोषित आहेत. अशा बालकांना जास्तीत जास्त अन्न मिळावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही महेश ढवळे म्हणाले.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर तालुक्यामध्ये कुपोषणाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. इथल्या कुपोषित बालकांना जास्तीत जास्त अन्न मिळवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू असे यावेळी महेश ढवळे म्हणाले.जळगाव जिल्ह्यात 2 हजार 696 किलो अन्न अजूनही शिल्लक आहे. प्रत्येका नागरिकापर्यंत अन्न पोहोचवलं तरीदेखील अजून पर्यंत इतके अन्न शिल्लक आहे. अशा वेळी गरजू कुटुंबांना याचा वाटप करावा. असे आदेश आम्ही देणार आहोत असे यावेळी महेश ढवळे म्हणाले.