जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसची दहशत अद्याप संपत नसली तरी त्यात आणखी एक व्हायरस जगाच्या मानगुटीवर बसू पाहत आहे. जगभरातील १२ देशात मंकीपॉक्स व्हायरसचे रुग्ण आढळून आल्यानंतर देशात देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्यांना याबाबत अलर्ट जारी केला असून आहे. महाराष्ट्र सरकारने त्यादृष्टीने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे.
जगभरात अद्याप कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होण्याची लक्षणे दिसत नसून चीन आणि अमेरिकेत दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन B4 प्रकारातील दोन रुग्ण गेल्या चार दिवसात भारतात आढळून आली आहेत. कोरोनाची भीती मनात असताना आणखी एक व्हायरस डोकं वर काढत आहे. जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. WHOच्या मते, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य जुनोटिक रोग आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतात. भारतात सध्या मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, इतर देशात आढळणारे रुग्ण पाहता भारतात केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 12 देशांमध्ये मंकीपॉक्सच्या ९२ प्रकरणांची पुष्टी केली आहे. येत्या काही दिवसांत हा विषाणू जगातील इतर देशांमध्येही वाढू शकतो, असा इशारा WHO ने दिला आहे. जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्र सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेत आंतरराष्ट्रीय विमानतळं, बंदर आणि देशाच्या सीमाभागांत लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, केंद्राच्या सूचनेनंतर महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे.
अशी आहेत मार्गदर्शक तत्वे :
- गेल्या 21 दिवसांत प्रभावित देशांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
- या संशयित रुग्णांची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- अशा रूग्णांवर उपचार करताना सर्व संसर्ग नियंत्रण पद्धती पाळल्या पाहिजेत.
- रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले जाईल.
- रक्ताची थुंकी आणि संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील.
- गेल्या 21 दिवसात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताबडतोब ओळखावे लागेल आणि त्यांना क्वारंटाईन करावे लागेल.
- जोपर्यंत संशयित रुग्णांच्या सर्व जखमा बऱ्या होत नाहीत आणि त्वचेचा एक नवीन थर तयार होत नाही, तोपर्यंत क्वारंटाईन संपवता येणार नाही, असे यात सांगण्यात आले आहे.