Big Breaking : केंद्रानंतर राज्याने देखील दिली गुड न्यूज, राज्याच्या करकपातमुळे पेट्रोल-डिझेल होणार ‘इतके’ स्वस्त
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने होरपळून निघणाऱ्या जनतेला शनिवारी केंद्र सरकारने दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol Diesel) अबकारी कर (Tax) कमी केला. त्यामुळे पेट्रोल 9.50 रुपयाने तर डिझेलचे दर 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्रापाठोपाठ आता महाराष्ट्रातील ठाकरे सरकरने देखील पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित कर (VAT) कमी केला. त्यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.
मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.
राज्याच्या कर कपातीनंतर आता जळगावमध्ये पेट्रोलचा प्रति लिटरचा दर ११०.११ रुपयावर येईल. तर डिझेलचा प्रति लिटरचा दर ९५.९ रुपयात येईल. यापूर्वी दोन दिवसाआधी पेट्रोल १२१.६९ इतके होते. तर दुसरीकडे डिझेलचा दर १०४.३४ रुपये इतका होता. मात्र दोन दिवसात पेट्रोल ११ रुपयांहून अधिकने स्वस्त झाले आहे. तर डिझेल ८ रुपयापर्यंत स्वस्त झाले आहे.