भुसावळ इगतपुरी मेमू या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे गाडी क्रमांक १११२० भुसावळ-इगतपुरी मेमू २७ मे ते १ जूनपर्यंत नाशिक शॉर्ट टर्मिनेट केली आहे. गाडी क्रमांक ११११९ इगतपुरी-भुसावळ मेमू २८ मे ते १ जूनपर्यंत नाशिकपासून सुरू होईल. या गाड्या प्री-कमिशनिंग ब्लॉकमुळे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेल्या आहेत.
भुसावळ-देवळाली शटल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च २०२० पासून बंद करण्यात आली होती. सर्वसामान्यांना प्रवाशांची गैरसोय होत असल्याने पॅसेंजर ऐवजी मेमू एक्स्प्रेस (memu train) चालवण्याचा निर्णय भुसावळ(Bhusawal) रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे १० जानेवारीपासून भुसावळ-इगतपुरी (Igatpuri) मेमू (Memu) ट्रेनला सुरुवात झाली आहे.
मात्र, गत दोन वर्षांहुन अधिक काळापासून बंद असलेली नाशिक देवळाली शटल व मुंबई-भुसावळ पॅसेंजर (Mumbai-Bhusawal Passenger) या दोन गाड्या अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. भुसावळ डिव्हीजनचे अधिकारी म्हणतात या गाड्या सुरु करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठविला आहे. तर त्यावर जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदारांचे ठरलले उत्तर म्हणजे, आमचा पाठपुरावा सुरु असून लवकरच या गाड्या सुरु होतील. मात्र सहा महिन्यांपासून खासदारांकडून केवळ खोटी आश्वासने मिळत आहेत. या प्रकाराला रेल्वेची मनमानी म्हणायची का खासदारांची निष्क्रियता? असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे.
नाशिक ते भुसावळ दरम्यान हजारो चाकरमाने पोटापाण्यासाठी दररोज प्रवास करतात. त्यांच्यासाठी नाशिक देवळाली – भुसावळ शटलसह अन्य पॅसेंजर गाड्या सुरु करण्याची आवश्यकता आहे. पॅसेंजर गाड्यांमुळे केवळ चकारमन्यांचीच प्रश्न सुटणार नसून सर्वसामान्यांच्याही प्रवासाची सोय होणार आहे. चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ येथून जळगावला दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या मार्गावर चाकरमन्यांची संख्यादेखील अधिक आहे. गत दीड वर्षांपासून पॅसेंजर रेल्वे सेवेअभावी नोकरदारांचे हाल सुरू आहेत. आता सर्वच खासगी कार्यालये नियमित सुरु झाल्याने सर्व चाकरमन्यांची प्रचंड तारांबळ उडत आहे. सर्वसामान्य प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यामुळे रेल्वेने आतातरी प्रवाशांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा आहे.