स्व. अनिल ओचावार यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात पारवा या गावात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल देवराव ओचावार यांची १५ मे २०२२ रोजी मध्यरात्री अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जळगाव तर्फे जाहिर निषेध नोंदविण्यात आला व अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले .
सदर निवेदनात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने सांगण्यात आले की , माहिती अधिकार अधिनियमानुसार माहिती मागीतल्यानेच सूड भावनेतुन सदर निर्घृण व क्रूर हत्या झाल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासातून आणि प्रसार माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेले आहे. सदर घटना अत्यंत निंदनीय व धक्कादायक असुन महाराष्ट्रांच्या प्रागतिक परंपरेला काळीमा फासणारी आहे . तसेच शासन व प्रशासन भ्रष्टाचार मुक्त, लोकाभिमुख व पारदर्शक चालावे म्हणून काम करणाऱ्या हजारो माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे तथा जागरूक व संवदेनशील नागरिकांचे मनोधर्य खच्चीकरण करणारी आहे. ” त्यामुळेच मृत अनिल देवराव ओचावार यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषी आरोपीना सहा महिन्याच्या आत अत्यंत कठोर शिक्षा मिळावी. सदर प्रकरणात व कटात सामील असू शकणारे व अपराध्यांना चिथावणी देणारे सरकारी अधिकारी व सूत्रधार यांच्याही मुसक्या अवळाव्यात आणि त्यांची कसून चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांनाही याप्रकरणी सहआरोपी करण्यात यावे .
माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून जीव घोक्यात घालून काम करून प्रशासन व शासन पारदर्शक चालावे म्हणून आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता स्व. अनिल देवराव ओचावार यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी सरकारने तात्काळ दहा लाख रूपयांची अर्थिक मदत जाहिर करावी व द्यावी . माहिती अधिकार कार्यकर्त्यांना धमक्या देणे , त्यांना मारहाण करुन त्यांच्यावर हल्ले करणे , त्यांच्या हत्या करणे अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे , ही बाब अत्यंत गंभीर आहे . तरी माहिती अधिकार कार्यकत्यांची सुरक्षा व सरंक्षण या सबंधी शासनाने धोरणात्मक उपाययोजना कराव्यात. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनि मागणी केली असल्यास त्यांना आवश्यक तेथे तातडीने पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे . सदर निवेदनाची गंभीर दखल घेऊन उचित कार्यवाही करून सबंधितांना त्वरित योग्य न्याय मिळवुन द्यावा . या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या . सदर निवेदन देतांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कोल्हे , शैलेंद्र सपकाळे , नरेंद्र सपकाळे , गुणवंतराव सोनवणे , विठ्ठल भालेराव , चंद्रकांत श्रावणे , रोहित सोनवणे उपस्थित होते .