दुर्दैवी : वीज पडून ३३ जणांचा मृत्यू, मोदींनी केले ट्वीट..
जळगाव लाईव्ह न्यूज ।२१ मे २०२२ । बिहार राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज पडून झालेल्या अपघातात 33 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देव मृतांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असे ट्विट करत शोक व्यक्त केला. दरम्यान, मुसळधार पावसानंतर बिहारमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तसेच राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्यात करत असल्याच देखील पंतप्रधान मोदी म्हणाले. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज पडून झालेल्या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्यामुळे खूप दुःख झाले आहे. देव शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो. राज यसरकार स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचाव कार्य सक्रियपणे करत असल्याचे मोदी म्हणाले.
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये
गुरुवारी (दि. 19) रोजी वादळ आणि गडगडाटामुळे भागलपूरमध्ये 7, मुझफ्फरपूरमध्ये 6, सारणमध्ये 3, लखीसरायमध्ये 3, मुंगेरमध्ये 2, समस्तीपूर , जेहानाबाद, खगरिया , नालंदा, पूर्णिया, बांका, बेगुसराय, अररिया, जमुई, कटिहारमध्ये 2 तर दरभंगामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या आपत्तीच्या काळात आपण पीडित कुटुंबांसोबत असल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तातडीने देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
तसेच खराब हवामान असताना सर्वांनी संपूर्ण दक्षता घ्यावी. खराब हवामानाच्या प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा. खराब हवामानात घरीच रहा आणि सुरक्षित रहा, असे आवाहनही मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वादळ आणि वीज पडण्याच्या घटनेमुळे पिके आणि घरांच्या नुकसानीचा आढावा घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्याचबरोबर लोकांना खराब हवामानात पूर्ण खबरदारी घेण्याचे आणि घरात राहण्याचे आवाहन त्यांनी केले.