⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | Historical Places : जळगाव जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांच्या यादीतील ‘टॉप फाईव्ह’

Historical Places : जळगाव जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांच्या यादीतील ‘टॉप फाईव्ह’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । गिरणा, तापी, काशीत नांदे धरतीचा राजा, जय जय जय खान्देश माझा।। या ओळी आठवल्या कि जळगाव खरोखर इतके सुंदर आहे का? असा प्रश्न पडतो. जळगाव जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांची (Tourist Places in Jalgaon) माहिती आपण कुठेतरी ओझरती वाचली किंवा ऐकली आहे परंतु अद्यापही अनेकांना हि प्रेक्षणीय स्थळे आणि त्यांची अद्भुतदा माहिती नाही. खान्देश असा प्रांत आहे ज्याठिकाणी भगवान श्रीराम, श्री साई बाबा, छत्रपती शिवाजी महाराज अशा महनीय दैवतांचा पदस्पर्श झाला आहे. जळगाव जिल्ह्यात पर्यटक नेहमी येतात पण इथून अजिंठा लेणीला जातात. जळगावातीलच आणि स्थानिक जळगावकरांनी देखील भेट दिली नसेल अशा काही अद्भुत प्रेक्षणीय स्थळांची माहिती आणि महती आम्ही आज आपल्यापर्यंत पोहचविणार आहोत. पर्यटकांनी जळगावात आल्यावर या पर्यटन स्थळांना अवश्य भेट द्यायला हवी असे हे टॉप फाईव्ह पर्यटन स्थळ आहेत.

महामायुरी बौद्ध ग्रंथात उल्लेख असलेल्या १२ लेण्यांचा नजारा ‘पितळ खोरे लेणी’
चाळीसगाव शहरापासून अवघ्या ३५ किलोमीटर अंतरावर वसलेली पितळ खोरे लेणी. राजा सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) ते नालासोपारा हा अतिप्राचीन रहदारीचा प्रमुख मार्ग पितळखोऱ्याहून जात होता. त्यामुळेच लेणी कोरण्यासाठी या जागेची निवड करण्यात आल्याची माहिती आहे. ‘महामायुरी’ या बौद्ध ग्रंथामध्ये ‘शकरीन’ हा यक्ष ‘पितलिंगया’ येथे राहतो, असा उल्लेख आला आहे. वरील ग्रंथाच्या संदर्भातून पितलिंगया म्हणजे आताचे पितळखोरे आहे असे अभ्यासक म्हणतात. पितळखोरे हा भारतातील सर्वात प्राचीन लेणीसमूह असून तो शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. येथील लेणी खोल व अरुंद दरीच्या दोन्ही काठांवरील दगडात कोरलेली आहेत. लेण्यांचे पाण्याच्या प्रवाहामुळे दोन भाग झाले आहेत. एका भागात क्र. १ ते ९ व दुसऱ्या भागात क्र. १० ते १२ लेणी आहेत. दोन्ही गटांतील लेणी एकामेकांसमोर आहेत. येथून एक मार्ग औरंगाबादकडे जातो.

इंग्रज शास्त्रज्ञ विल्सन फर्ग्युसन व बर्जेस यांनी सर्वप्रथम पितळ खोरे लेणी प्रथम लोकाभिमुख केली. येथील पुरातत्त्वीय संशोधनावरून ही लेणी दुसऱ्या शतकाच्या जवळपास वापरात होती. नंतर पुन्हा पाचव्या सहाव्या शतकात येथे वर्दळ सुरू झाली. हे दोन्ही काळ अनुक्रमे सातवाहन व वाकाटकांचे होते. लेण्यांच्या प्रवेशद्वाराला अकरा पायऱ्या आहेत. उजव्या बाजूस हत्तींची रांग आहे. जणू काही लेण्यांचा सर्व भार हे हत्तीच पेलत आहेत असा भास होतो. प्रवेशद्वाराचा पट्टा अर्धकमळ व त्रिरत्नांच्या नक्षीने सजविला आहे. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन द्वारपाल उभे आहेत. इथे व्यापार व त्यावररच्या बाजूस हत्तीचे शिल्प आहे. उजव्या हत्तीवर किन्नरांचे शिल्प आहे. काही अभ्यासक असे देखील म्हणतात कि, अजिंठा लेण्या कोरण्यापूर्वी पितळ खोरे लेणींचे काम हाती घेण्यात आले होते मात्र येथील खडक टणक अर्धवट सोडून देण्यात आले होते.

ताम्रपाषाण युग, पूर्व लोहयुग अशा पाच कालखंडाच्या वस्तीचे अवशेष असलेले ‘बहाळ – टेकवाडे’
चाळीसगावपासून उत्तरेकडे २५ किलोमीटर अंतरावर गिरणा नदीच्या उत्तर काठावर बहाळ हे गाव तर दक्षिण काठावर टेकवाडे हे गाव अगदी प्राचीन काळापासून वसलेले आहे. आजही या दोन्ही गावांचा उल्लेख ‘बहाळ-टेकवाडे’ असा संयुक्तपणेच केला जातो. बहाळ गाव ‘कसबे बहाळ’ आणि ‘पेठ’ बहाळ’ अशा दोन विभागांत विभागलेले आहे. गिरणा नदीकाठी असलेल्या बहुळा देवीच्या प्राचीन मंदिरावरून या गावास ‘बहाळीये’ व पुढे ‘बहाळ’ असे नाव पडले आहे. महानुभावांच्या ऋद्धीपूर वर्णनग्रंथातही ‘बहालिये’ असा बहाळ गावांचा उल्लेख आलेला आहे. पहिल्या शतकातील कवी राजशेखर याने संस्कृत भाषेत कोरलेले दोन ताम्रपट वजीरखेडे, ता.मालेगाव, जि. नाशिक येथे सापडले असून या दोन्ही संस्कृत ताम्रपटांत गिरणा नदीचा उल्लेख गिरीपर्णा असा आहे. बहाळ व टेकवाडे येथे अलीकडे सापडलेले जुने अवशेष हे नदीखोऱ्यांमध्ये होऊन गेलेल्या प्राचीन संस्कृतीचा एक भाग होत.

बहाळ-टेकवाडे येथील उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून येथे ताम्रपाषाणयुग, पूर्व लोहयुग (इ.स.पू. ६०० ते ३००), पूर्व इतिहासकाळ (इ.स.पू. ३०० ते इ.स.१००), यादव मुस्लिम राजवटी (इ.स.१२०० ते १७००), मराठा काळ (इ.स.१८००) अशा पाच कालखंडांत वस्ती झाली असे दिसते. बहाळ येथील पहिली वस्ती ताम्रपाषाणयुगीन असून तिचे सांस्कृतिकदृष्ट्या दोन विभाग करण्यात आले आहेत. पहिल्या जोतेसदृश विभागात राखाडी रंगाची मडकी, पातळ पोताची, लाल गेरूने रंगकाम केलेली राखी रंगाची खापरे, मोठे रांजण, त्यावर चिखलाच्या पट्ट्या चिकटवून अलंकरण केलेली, मातृकामूर्ती चिकटवलेली साधने आहेत, तर दुसऱ्या भागात उत्कृष्ट बनावटीची लाल रंगाची मडकी, त्यावर काळ्या रंगाची नक्षी व जनावरांची चित्रे, चमकदार रंगाची खापरे आहेत. गारगोटींच्या छिलक्यांची हत्यारे, मातीचे व शंखांचे मणी, मातीचे कंगवे आणि तांब्याचा मर्यादित वापर, मृत्यूनंतर दफन इत्यादी गोष्टी आढळून आल्या असून त्यामुळे बहाळचा गुजरात-मध्यप्रदेश या प्रदेशांशी असलेला संपर्क स्पष्ट होतो.

हे देखील वाचा : Jalgaon Famous Food : जळगावात आलेल्या पाहुण्यांनी चाखायलाच हवा असा अस्सल खान्देशी बेत!

स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना ‘फरकांडेचे झुलते मनुरे’
एरंडोल शहरापासून १६ किलोमीटरवर आणि कासोदा या गावाच्या पश्चिमेला ४ कि.मी. अंतरावर फरकांडे हे गाव उतावली नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावी नदीच्या किनाऱ्यावर पिसा येथील झुलत्या मनोऱ्यांची आठवण करून देणारे व स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणून प्रसिद्ध असलेले झुलते मनोरे आहेत. काही इतिहासतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सुमारे २५० वर्षांपूर्वी चांदमोमीन नावाच्या इसमाने ही मशीद बांधली आहे. तर काही इतिहासतज्ज्ञांच्या मते फारूकी राजांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी या वास्तूची निर्मिती केली असावी. फारूकी घराण्यावरून या गावास फरकांडे हे नाव पडले असावे, असा अंदाज आहे. या वास्तूचे दोन्ही मनोरे अस्तित्वात होते तेव्हा त्यांना पाहताक्षणीच पाहणाऱ्याला इजिप्तच्या पिरॅमिडची आठवण येत होती. या प्रसिद्ध वास्तूच्या दर्शनी भागात हे दोन झुलणारे मनोरे होते. हे हलते मनोरे म्हणजे तीन घुमटांनी युक्त अशा मशिदीचे पुढील दोन मिनार आहेत.

मनोऱ्यांची प्रत्यक्ष उंची १५ मीटर आहे. हे दोन्ही मिनार वरील बाजूला निमुळते होत गेले आहेत. त्यांच्या पायाचा खालचा व्यास जवळपास ३ मीटर रुंदीचा होता. या दोन्ही मनोऱ्यात प्रत्येकी ४१ पायऱ्या थेट वर चढून जाण्यासाठी होत्या. याशिवाय उजेडासाठी व वायुविजनासाठी झरोके देखील निर्माण केलेले होते. मनोऱ्याच्या थेट वरच्या बाजूला चढून गेले, की फरकांडे गावाच्या आजूबाजूचा पंचक्रोशीचा प्रदेश सहज दृष्टीस पडत असे. या मनोऱ्यांचे वैशिष्ट्य असे, की एक मनोरा हलविल्यावर आपोआप दुसरा मनोराही हलत असे. सद्यस्थितीत चार मनोऱ्यापैकी एकच मनोरा अस्तित्वात आहे. जळगाव जिल्ह्यातील पुरातन वारसा न जपल्याने आज हि एक ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

वन्यजीवांनी संपन्न असलेले ‘यावल अभयारण्य’
यावल वन्यजीव अभयारण्य जळगाव जिल्ह्यातील वनस्पती आणि प्राण्यांच्या अस्तित्वाने संपन्न असलेले अभयारण्य. सुकी, अनेर आणि मांजल या तीन नद्या आणि त्यांना मिळणारे छोटे-मोठे नाले यामुळे अभयारण्याचे क्षेत्र हिरवेगार आणि जैवविविधतेने संपन्न आहे. पर्यटक, वन्यजीव अभ्यासक, पक्षीनिरीक्षक अशांसाठी हे अभयारण्य आकर्षणाचे ठिकाण आहे. येथील चिंचाटी व्ह्यू पॉइंट, पालोबा पॉइंट, पाच पांडव या उंच शिखरांवरून परिसराचा रमणीय देखावा दिसतो. गरुड, सुतार या पक्ष्यांसह २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी, पट्टेदार वाघ, बिबट्या, अस्वल, कोल्हा, लांडगा, रानकुत्रा, रानडुक्कर, रानमांजर, चिंकारा, हरिण, चितळ, चौशिंग्या, सांबर आणि नीलगाय अशी विपुल वन्यजीव संपदा येथे आहे. साग, अंजन, ऐन, शिसव, तिवस, खैर, हिरडा, बेहडा, तेंदू अशा वृक्षवैभवाने हे अभयारण्य नटलेले आहे. याचबरोबर येथे असंख्य औषधी वनस्पतीही आढळतात. अभयारण्याचे क्षेत्र नैसर्गिक उच्चप्रतीचे वन या प्रकारात मोडते. अभयारण्यात प्रामुख्याने तडवी, पावरा, कोळी या आदिवासींचे वास्तव्य आहे. त्यामुळे वनपर्यटनादरम्यान त्यांच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचाही अनुभव मिळतो. पर्यटनाचा कालावधी हा सप्टेंबर ते फेब्रुवारी हा आहे. पर्यटकांसाठी परिसरात शासकीय विश्रामगृहाबरोबर खासगी निवासव्यवस्थाही उपलब्ध आहे.

पाल येथील ‘हत्तीवाडा’
पाल हे सातपुड्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ जळगावहून ७४ कि.मी. अंतरावर तर रावेरपासून जवळच आहे. पूर्वीच्या काळी पाल हे जवळपास असलेल्या ७३ गावांचे मुख्य ठाणे होते. पाल येथील जुन्या किल्ल्याचे बुरुज, तट व इतर अवशेष तसेच सुकी नदी काठावरील नागझरीचे अवशेष या स्थळाची प्राचीनता दर्शवितात. आभीर अधिपतींचे राज्य असताना येथे त्यांचे स्थानिक मुख्यालय होते. पुढील काळात फारुकीचे देखील येथे ठाणे होते. येथील हत्तीवाड्याचे अवशेष पाहता पालला बरेच ऐतिहासिक महत्त्व असावे हे लक्षात येते. काही अभ्यासकांच्या मते हत्तीवाडा म्हणजे सुरक्षित बंदिस्त बाजारपेठ असावी. मागील काही वर्षांत पालला स्थानिक पर्यटनस्थळाचे महत्त्व आले असून तेथे अभयारण्यही उभारण्यात आले आहे. वन विभागाच्या विश्रामगृहाव्यतिरिक्त पर्यटकांसाठी कुटीरही उपलब्ध आहेत. पाल सर्वांना एक थंड हवेचे ठिकाण म्हणून माहिती आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात पाल परिसरात असलेले लहानमोठे धबधबे, नदी, नाले, हिरवळ, डोंगररांगा निसर्ग आपल्याला आकर्षित करतात.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह