जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२२ । शहरातील तांबापुरा परिसरात मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दोन गटात वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन तुफान दगडफेक झाली. दोन्ही गटातील तरुणांनी दगड, विटा, काचेच्या बाटल्यांचा उपयोग केला. घटनास्थळी पोलीस पोहचले असून संशयितांची धरपकड सुरू आहे. मासुमवाडी परिसरात देखील दोन गटात वाद झाला. दोन्ही घटनेत ५ पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे समजते.
मेहरूण परिसरात असलेल्या तांबापुरा भागात मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दोन तरुणांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक सुरू झाली. बिस्मिल्ला चौकाजवळून वाद सर्व परिसरात पोहचला.
दंगेखोरांनी केलेल्या दगडफेकीत मोठे नुकसान झाले असून एक दुचाकी, पाण्याच्या टाकीची तोडफोड झाली आहे. काही घरांच्या काचा फुटल्या असून परिसरात दगड, विटा, काचांचा खच पडलेला आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले, इतर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे.
पोलिसांनी संशयितांची नावे काढून धरपकड सुरू केली आहे. दरम्यान, मासुमवाडी परिसरात देखील दोन गटात वाद झाला होता. सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दोन्ही घटनेत ५ जण जखमी झाल्याचे समजते.