जळगाव मनपा : जळगावकरांना यंदाही तुडवावा लागेल चिखल, डांबरी रस्त्यांची शक्यता धूसर
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव मनपा । शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आग्रही असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीमुळे जळगावकरांना यंदा देखील चिखलच पावसाला घालवावा लागणार आहे. शासनाने दिलेल्या ४२ कोटींपैकी १६ कोटी निधीतील रस्त्यांची कामे सुरु करण्याचा अळथडा दूर झाला असला तरी, मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी जो तारीख पे तारीखचा खेळ चालविला आहे. त्यामुळे डांबरी रस्त्यांचे काम मार्गी लागण्याची शक्यता धुसर दिसून येत आहे.
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहरातील रस्त्यांच्या विविध विकास कामांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. त्यापैकी ४२ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली होती. परंतु या निधीला अनेक विघ्न आले असून कोरोना काळात राज्यशासनाने देखील या निधीला स्थगिती दिली होती. दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व मनपातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या निधीवरील स्थगिती उठवली, त्यानंतर सदर निधीतून प्रस्तावित काही प्रस्तावित कामांमध्ये बदल करण्यात आला असून रस्त्यांच्या कामांचा सामावेश करण्यात आला होता.
या सर्व प्रक्रियेमध्ये बराच वेळ गेल्यानंतर मक्तेदाराने बदल झालेल्या कामांना पुर्वीच्या रेट नुसार करण्यास नकार दिला होता. त्यानंतर पालकमंत्र्यांनी यात मार्ग काढत बदल न झालेल्या १६ कोटींच्या कामांना सुरुवात करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यामुळे दोन दिवसात कामे सुरु होतील अशी आशा होती मात्र, ,५ दिवस उलटले तरी देखील कामांना सुरुवात झालेली नसून आता सार्वजनिक बांधकाम विभागाने मनपाचा हिस्सा असलेले ५ कोटी १० लाख रुपये हे आरटीजीएसने स्विकारण्यास नकार दिला आहे.
सां.बा.च्या अधिकाऱ्यांनी आम्हीला आरटीजीएस नको, धनादेशाद्वारे रक्कम द्या, अशी मागणी केल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे. महापालिकेचे सर्व व्यवहार सध्याच्या घडीला एनएफटी व आरटीजीएसने होत असल्यामुळे मनपा प्रशासनाकडे चेक बुकच नव्हते. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून रस्त्यांचे काम सुरु करण्याच्या विषयाला ब्रेक लागला आहे.
आता मनपा प्रशासनाकडून बँकेकडे चेकबुकची मागणी केली असून चेकबुक मिळाल्यानंतर पैसे वर्ग केले जाणार आहेत. यात वेळ गेल्यास ४२ कोटीमधून शहरातील एकही रस्त्याचे काम मार्गी लागणार नाही व शहरातील नागरिकांना यावर्षी देखील चिखलच तुडवावा लागणार आहे.