जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि गेल्या एकशे दहा वर्षांची परंपरा असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी गुरुवारी झालेला राडा सर्वांनीच पाहिला. कोणत्याही राजकीय नेत्याला आणि एका माहीर गुंडाला लाजवेल असा प्रकार या निवडणुकीवेळी घडला. उच्चभ्रू आणि बहुतांशी शिक्षकांचा समावेश असलेल्या या ग.स.मध्ये सरकारी नोकर आहेत की गुंड आणि अट्टल राजकारणी असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ संचालक फोडाफोडीवरून भर रस्त्यावर दिसून आलेला असंस्कृतपणा आपल्या पेशाला लाजविणारा असल्याचे भान देखील त्यांना उरले नव्हते.
सहकार, लोकसहकार व प्रगती पॅनल या तिन्ही गटातील २१ संचालक निवडून आले. कोणत्याही गटाला संपूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील सुसंस्कृत सरकारी नोकर कशाप्रकारे ही निवडणूक लढवतात आणि जिंकतात हे बघण्यामध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्याला रस होता मात्र फोडाफोडीचे राजकारण आणि वापरण्यात आलेली मसल पॉवर यामुळे हे सरकारी नोकरीत आहेत कि केवळ ते सरकारी नोकर असल्याचे दाखवण्यापुरतेआहेत असा प्रश्न आजच्या चव्हाट्यावर मांडलेल्या भांडणामुळे पाहायला मिळाला. ग.स.सोसायटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही रंगतदार होणार हे सर्वांनाच माहिती होते. पहिल्यांदा ५ गट मैदानात उतरले आणि केवळ तिघांना बाजी मारता आली. त्यात देखील एकालाही बहुमत मिळाले नाही.
प्रगती पॅनल आणि लोकसहकार पॅनल यांनी युती केल्याने येणारी निवडणूक सोपी होईल असा अंदाज होता मात्र ऐनवेळी सहकार पॅनेलने लोकसहकार पॅनलचे दोन संचालक आपल्या गटात खेचले आणि सरकारी नोकऱ्यांमधील अस्सल राजकारण संपूर्ण जिल्ह्याने पाहिले. कोणालाही बहुमत मिळाले नसल्यामुळे जे गट ठरवतील तेच होईल अशी आशा सर्वांना होती मात्र या सरकारी नोकरांमधला मधला मुत्सद्दी राजकारणी सर्वांनी पाहिला. सहकार गटाचे उदय पाटील यांनी मास्टर स्ट्रोक खेळाला. बुधवारी सायंकाळी युती करून पत्रकार परिषद घेणाऱ्यांना त्यांनी सकाळी दैनिकात झळकलेल्या फोटोने उत्तर दिले. फोटो पाहून लोकसहकार गटाची झोपच उडाली.
सहकार गटाचे सदस्य चार चाकीने मतदार स्थळी पोहोचल्यावर लोकसहकार गटाकडून फोडण्यात आलेल्या ज्ञानेश्वर सोनवणे व रविंद्र सोनवणे यांना चारचाकीतून बाहेर पडू न देण्याची भूमिका लोकसहकार गटातर्फे घेण्यात आली. लोकसहकार गटाच्या कार्यकर्त्यांनी इतका गोंधळ घातला की, अक्षरशः त्यांच्या गाडीच्या काचा फोडायचा प्रयत्न ही यावेळी या गटातील सरकारी नोकरांनी केला. दोन्ही गटांच्या सदस्यांमध्ये यावेळी जोरदार शिवीगाळ झाली. शिवीगाळ इतकी टोकाची होती की सुसंस्कृत, सुशिक्षित, शिक्षक, सरकारी नोकर हा शिवीगाळ करत आहेत की अशिक्षित कार्यकर्ते ही शिवीगाळ करत आहेत हेच समजायला मार्ग नव्हता. पोलिसांच्या मध्यस्थीने अर्ध्या तासानंतर शिवीगाळ थांबली. या शिवीगाळ यानंतर या सरकारी नोकर यांना स्वतःच्या अंतर्मनात वेदना झाल्या असतील अशी अपेक्षा करणे योग्य आहे की अयोग्य ? हे देखील सांगणे यावेळी कठीण आहे.
सहकार गटाला अध्यक्ष पद मिळाल्यानंतर सहकार गटाचे नवनियुक्त अध्यक्ष उदय पाटील यांनी समोरच्या दोन्ही गटांवर निवडणुकीवेळी पैसा वाटप केल्याचा आरोप ठेवला. याचबरोबर साडेसात हजार मतदार भगिनींना पैठणी वाटली असाही आरोप यावेळी उदय पाटील यांनी केला. जर ही सोसायटी सरकारी नोकरांची आहे तर सरकारी नोकर निवडणुकीवेळी इतका पैसा कसा खर्च करू शकतात ? असा प्रश्न देखील यामुळे उपस्थित झाला. अखेरीस सांगायचे झाले तर ज्या ग.स. सोसायटीकडे संपूर्ण जळगाव जिल्हा एका आदराने पाहतो. सुसंस्कृत सरकारी नोकरांची पतपेढी म्हणून पाहतो, अशा पतपेढीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी झालेला हा तुफान राडा सरकारी नोकर देखील सत्तेसाठी कसे रूप बदलू शकतात हे दाखवितो.