जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२२ । शेतातील बांधावर असलेल्या पाण्याच्या चारीत पडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील अट्रावल येथे उघडकीस आलीय. लिलाबाई रामकृष्ण चौधरी, (वय-७५) असे मयत वृद्धेचे नाव असून याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे घटना?
अट्रावल येथील लिलाबाई चौधरी या काल १० मे रोजी शेतात जाऊन येते असे सांगून घरातून निघाल्या होत्या. मात्र त्या उशीरापर्यंत घरी न आल्याने अट्रावल गावातील पोलीस पाटील पवन चौधरी, चंद्रकांत चौधरी, योगेश चौधरी, रविन्द्र चौधरी, अभय महाजन व काही ग्रामस्थांच्या मदतीने लिलाबाई यांचा शोध घेण्यात आला.
दरम्यान, आज दि.११ मे रोजी सकाळी १० वाजता अट्रावल शिवारातील देशमुखीतील नामदेव धनजी ढाके यांच्या शेताजवळच्या बांधावर असलेल्या पाण्याच्या चारीत लिलाबाई चौधरी या मृत अवस्थेत आढळुन आल्या. त्या वयोवृद्ध असल्याने पाण्याच्या चारीत कोसळून त्यांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मयताचे नातू परेश चौधरी यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत लिलाबाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बी. बी. बारेला व वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुर चौधरी यांनी केले.