जळगाव लाईव्ह न्युज | १० मे २०२२ | येत्या पंधरा दिवसात निवडणुका जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये राजकीय गणिते आखण्याची सुरुवात झाली आहे. यामुळे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी झाल्यास भाजपला धोबीपछाड देणे सहज शक्य असल्याचा सूर शिवसेना नेत्यांमध्ये आहे.
जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसने एकत्र येऊन निवडणूक लढवावी असा सूर नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या बैठकीत पहायला मिळायला. जळगाव जिल्हा परिषदेचे मध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भाजपच वर्चस्व आहे. जिल्ह्यात विरोधक एकत्र आल्यास भारतीय जनता पक्षाला दणका बसू शकतो असा सूर शिवसेना नेत्यांमध्ये आहे..
जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपला तेव्हा जिल्हा परिषदेत एकूण ६७ जागा होत्या ज्या मध्ये भारतीय जनता पक्षाकडे ३० , राष्ट्रवादी काँग्रेसकडे १६, शिवसेनेकडे १४ तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे ४ असे गणित होते. भाजपने सत्तेवर येण्यासाठी काँग्रेसचे २ सदस्यांना फोडले आणि तेव्हा जीप आपल्या ताब्यात घेतली. मात्र जर त्या वेळी देखील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र राहिले असते तर चित्र उलट झाले असते असेही या बैठकीत म्हटले गेले.
महाविकास आघाडीकडे सत्ता राहिली तर राज्य पातळीवर सत्ता स्थापन करण्यात आलेल्या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला स्थानिक पातळीवर देखील वापरायला हवा असा सूर यावेळी ऐकायला मिळाला
महाविकास आघाडी एकत्रलढेल असे केवळ सांगून चालणार नाही तर गट-तट पक्ष यातून बाहेर पडून एकत्र येऊन राजकारण केले तरच भारतीय जनता पक्षाला रोखण्यात महाविकास आघाडीला यश मिळेल असा सूर बैठकीत ऐकायला मिळाला. कारण जर महा विकास आघाडी एकत्र आली आणि समन्वय घडला तर भारतीय जनता पक्षाला धोबीपछाड करता येईल मात्र हे सगळे घडेल जर हे तिन्ही पक्ष एकत्र आले तरच. असाही सूर यावेळी बैठकीत पाहायला मिळाला.