जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२२ । जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेच्या लाटेचा कहर सुरूय. सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील सर्वाधिक तापमान काल सोमवारी भुसावळ येथे ४७.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले तर जळगावमध्ये ४५.८ अंश सेल्सिअस एवढे नाेंदवण्यात आले. वाढत्या उन्हामुळे जळगावकर चांगलेच हैराण झाले आहे. आगामी तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहील. दरम्यानं भुसावळमध्ये उष्माघाताचे आठ रुग्ण दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात गेला एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे यंदाचा मे महिना कसा जाणार याची चिंता जळगावकरांना सतावत आहे. मात्र मे महिन्यात तर उष्णतेच्या लाटेचा कहर सुरु आहे. ढगाळ वातावरणातदेखील जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र पातळीवर आहे. साेमवारी दुपारी ४ वाजेनंतर वातावरण ४५ टक्के ढगाळ असूनही उष्ण वाऱ्यामुळे तापमान कमी झाले नाही. दुपारी २.३० वाजता जळगावात हवामान विभागाकडून यंदाच्या मे महिन्यातील सर्वाधिक उच्चांकी ४५.८ अंश सेल्सिअस एवढे तापमान नाेंदवले गेले.
राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद जिल्ह्यातील भुसावळ येथे ४७.२ अंश सेल्सिअस इतकी करण्यात अली. भुसावळात सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक तापमान होते. भुसावळात यापूर्वी १७ मे २०१६ रोजी सर्वाधिक ४८ अंश तापमानाची नोंद झाली होती.
भुसावळसह जिल्ह्यात सकाळ १० वाजेपासूनच तापमानाचा पारा ४० ते ४१ अंशावर जात असल्याने नागरिकांना हा उष्मा असह्य झाला आहे. दिवसा घराबाहेर न पडण्याबरोबरच थंडगार फळांबरोबर कोल्ड्रींक्स, ताक, सोलकडी, माठातील पाण्याने गारवा शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. सायंकाळच्या वेळेस देखील तापमानाचा पारा ४० ते ४१ अंश पर्यंत राहत असून उष्ण वाऱ्यामुळे उष्णतेच्या झळा जाणवत आहे.
जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?
वेळ – अंश
१० वाजेला – ४१ अंश
११ वाजेला – ४२
१२ वाजेला – ४३ अंश
१ वाजेला- ४३ अंशापुढे
२ वाजेला – ४३ अंश
३ वाजेला – ४३ अंशापुढे
४ वाजेला – ४३ अंश
५ वाजेला – ४३ अंश
६ वाजेला – ४१ अंश
७ वाजेला – ३९ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३७ तर रात्री ९ वाजेला ३६ अंशावर स्थिरावणार.