जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२२ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील अनेक बंदिवान कैदी उपचाराच्या बहाण्याने जिल्हा रुग्णालयात दाखल होत असतात. उपचार घेणाऱ्या कैद्यांवर अनेक वेळा आरोप देखील होत असतात. जिल्हा रुग्णालयातील कैदी वार्डात रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास दोन कैद्यांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. जिल्हापेठ पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे संपूर्ण प्रकरणाची चौकशी लावणार आहेत.
जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालयातील कैदी वार्डात नेहमी अनेक कैदी उपचारार्थ दाखल असतात. काही कैद्यांचा तर वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी येऊन जाऊन मुक्काम असतो. रविवारी रात्री १०.१५ ते १०.३० च्या सुमारास काही कैद्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. काही वेळात वाद वाढून हाणामारी झाली. एका कैद्याने तर नातेवाईक आणि काही तरुणांना बोलावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा रुग्णालयात झालेल्या या प्रकाराने सर्वच घाबरले होते. दिवसभर या प्रकरणाची चर्चा होती. जिल्हापेठ पोलिसात दशरथ महाजन वय-४८, रा.एरंडोल यांच्या फिर्यादीवरून सतीश गायकवाड वय-४१ रा.जुने जळगाव याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. काहीही कारण नसताना रात्री १०:१५ ते १०:३५ दरम्यान संशयिताने शिवीगाळ, दमदाटी करीत पाठीवर आणि डोक्यावर मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तपासाच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी गुन्ह्याच्या माहितीसाठी जिल्हा रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले, जिल्हा रुग्णालयात झालेल्या प्रकाराची माहिती मिळाली असून पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गुन्ह्याची गंभीर दखल घेण्यात आली असून संपूर्ण प्रकार काय होता, कसा घडला, कोण-कोण दोषी आहे, कुणाचा सहभाग आहे? हे सर्व तपासण्यासाठी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्याकडे चौकशी सोपविण्यात येणार आहे. चौकशीअंती सर्व समोर येईलच असे डॉ.मुंढे यांनी सांगितले.