जळगाव लाईव्ह न्युज | ६ मे २०२२ | जळगाव येथील सेवाभावी सामाजिक संस्था लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानतर्फे बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचा शतकोत्तर स्मृतिदिन भादली स्टेशन परिसरातील त्यांच्या स्मृतिस्थळी छोटेखानी कार्यक्रमात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संग्राम जोशी यांनी बालकवी ठोंबरे यांच्या साहित्यिक कार्याबाबत उपस्थितांशी सुसंवाद साधला व बालकवींच्या कार्याबाबत स्वरचित पोवाडा सादर केला. यावेळी भादली रेल्वे स्टेशनचे उप स्टेशन प्रबंधक आर. मीना, रफिक खान, भाजपा युवा मोर्चा सोशल मीडियाचे भूषण जाधव, संस्थेचे सचिव संदीप जोशी, जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागातील सहकारी किशोर कुळकर्णी, चित्रकार योगेश सुतार यांच्यासह अनेक साहित्य प्रेमींची उपस्थिती होती. श्रावण मासी हर्ष मानसी, आनंदी आनंद गडे, फुलराणी, औदुंबर अशा कविता अभ्यासून मोठा झालेला मराठी माणूस बालकवी ठोंबरे यांच्या विषयी कृतज्ञता भाव मनाच्या कप्प्यात ठेवतो. परंतु धका धकीच्या या काळात माणूस यंत्रवत झालेला आहे.
आता कुणाकडे कुणासाठी वेळ राहिलेला नाही. आज बालकवी ठोंबरे यांचा स्मृतिदिन आहे परंतु दिवसभरात रेल्वे प्रशासनाने त्यांचे स्मृतिस्थळ स्वच्छ करू नये, किंवा समाधी स्थळावर दोन फुले अर्पण करू नये. रेल्वे प्रशासनाचे सोडा परंतु साहित्यिक देखील या समाधीस्थळाकडे फिरकलेले दिसत नाहीत याबाबत खेद वाटतो. ज्या व्यक्तीने साहित्य विश्वात अवघ्या २८ वर्षाच्या अल्प आयुष्यात इतके उत्तुंग कार्य केले त्यांच्याबाबत इतकी अनास्था असणे हे लक्षण भविष्यासाठी बरे नव्हे. असे परखड मत व्यक्त केले. त्या बरोबरच थेट रेल्वे मंत्रालयात पत्रव्यवहार करून भादली स्टेशन परिसरात बालकवी ठोंबरे यांचे स्मृतिस्थळ नव्याने बांधण्यासाठी पाठपुरावा केला अशा जैन इरिगेशनच्या किशोर कुळकर्णी यांचे कौतुक वाटते असाही आवर्जून उल्लेख संग्राम जोशी यांनी संवादात केला.