जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । शहराच्या मध्यवर्ती परिसरात असलेल्या एका मंदिरात परिसरातीलच महिला पूजेसाठी गेलेली होती. मंदिरात पूजा करीत असताना मंदिरातील पुजाऱ्याने महिलेला सीताराम म्हणण्यास आग्रह केला. महिलेने प्रतिसाद न दिल्याने पुजाऱ्याने तिच्याशी अंगलट करून आक्षेपार्ह वर्तन केले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
शहरातील एका भागात राहणारी महिला त्यांच्या घराजवळ असलेल्या एका मंदिरात पुजेसाठी गेलेली होत्या. मंदिरात पूजा करीत असताना मंदिरातील पुजारी राम बालकदास महाराज वय-३१ याने महिलेला सीताराम म्हणण्यास सांगितले. महिलेने कोणताही प्रतिसाद न दिल्याने पुजाऱ्याने जवळ येत अंगलट करण्याचा प्रयत्न केला. मंदिरातील पुजारी त्या महिलेकडे वाईट नजरेने बघत असल्याने हे प्रकरण यापूर्वी तीच्या पतीला देखील सांगितले होते.
दरम्यान सोमवारी दि.२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पुजाऱ्याने सीताराम म्हणण्यावरून अंगलट करीत त्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पुजारीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुजाऱ्याला नोटीस बजावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करीत आहेत.