⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

शेतातील मक्याला आग, लाखाचे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज | २२ एप्रिल २०२२ । शेतातून गेलेल्या महावितरणच्या वीजतारांवर शॉटसर्किट होवून शेतातील मक्याला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना तालुक्यातील कुऱ्हाडदे येथे घडली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, कुऱ्हाडदे येथील सागर दादाजी नरोटे वय २८ यांची कुऱ्हाडदे शिवारात ३ एकर शेती असून यात त्यांनी मका लावलेला आहे. सोमवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास शेतावरुन गेलेल्या महावितरणच्या वीजतारांवर शॉर्टसर्किट होवून शेतातील मक्याला आग लागली. नेहमीप्रमाणे सकाळी शेतकरी सागर नरोटे हे शेतात येत असताना त्यांना मक्‍याला आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी शेतातील इतर कामगारांची सोबत पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नानंतर आग विझवली. या आगीत शेतातील एक एकरातील ४० क्विंटल एवढा १ लाख रुपये किंमतीचा मका खाक झाला. याबाबत शेतकरी सागर दादाजी नरोटे यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात आगीची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक स्वप्निल पाटील हे करीत आहे.