जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातून जात असलेल्या महामार्गाचे नव्याने होत असलेले काम, उड्डाणपूल, अंडरपास, मुख्य चौकातील सर्कल हे सर्वच हास्यास्पद गोष्ट आहे. आकाशवाणी चौकातील सर्कलला अगोदरच विरोध होता तरी देखील त्याची उभारणी करण्यात आली. मंगळवारी सकाळी एक मालवाहू वाहन सर्कलवर धडकल्याने अपघात झाला. एरव्ही दररोज रात्री सर्कलच्या मध्ये शेकडो नागरिक बसलेले असतात. जर त्या मालवाहू वाहनाच्या ठिकाणी मोठा ट्रक असता आणि वेळ सायंकाळ, रात्रीची असती तर झालेल्या प्रकारची कल्पनाच केली जात नाही.
जळगाव शहरातून जात असलेल्या महामार्गावर होत असलेले अपघात लक्षात घेता महामार्ग पुन्हा नव्याने तयार करताना ठिकठिकाणी उड्डाणपूल तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यातही उड्डाणपूल कुठे हवे आणि कुठे नको यावरून मोठे राजकारण झाले. मध्यंतरी काम रखडले. अखेर शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम पूर्णत्वास आले आणि मुख्य चौकात सर्कल तयार करण्याची संकल्पना उदयास आली. शहरातील वाहतूक लक्षात घेताच सर्कलला चौफेर विरोध झाला. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही रस्त्यावर उतरले. आंदोलने झाली आणि अवघ्या काही दिवसात विरोध देखील मावळला.
महिनाभरात सर्व सर्कल पूर्ण झाले. काही चौकात सर्कलचा व्यास कमी करण्यात आला. आकाशवाणी चौकात सर्वात मोठा सर्कल साकारण्यात आला असून त्याच्या एका बाजूला उड्डाणपूल आहे. शिवकॉलनीकडून येणारी वाहने भरधाव वेगात खाली येतात त्यामुळे एखादे वाहन उजव्या किंवा डाव्या बाजूने आल्यास नियंत्रण सुटते आणि अपघाताची शक्यता वाढते. सर्कलला नागरिकांचा विरोध असला तरी सर्कल तयार झाल्यावर सायंकाळच्या वेळी त्याठिकाणी बसणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. निवांत घालविण्यासाठी आणि सर्कलमध्ये शतपावली करायला अनेक नागरिक दररोज येत असतात.
सर्कलमध्ये बसलेल्या नागरिकांच्या चौफेर धोका आणि मृत्यू ये-जा करीत असतो याचे नागरिकांना भान नाही. मंगळवारी पहाटेच्या सुमारास उड्डाणपुलावरून उतरलेले एक मालवाहू वाहन सर्कलवर धडकले. सुदैवाने मालवाहू वाहन लहान होते आणि सायंकाळ, रात्रीची वेळ नव्हती. जर एखादे मोठे वाहन, लोडेड ट्रक, कंटेनर असते आणि सायंकाळी त्या सर्कलला धडक बसली असती तर तो जिल्हावासियांसाठी काळा दिवस ठरला असता. आपल्या जळगावकर राजकारण्यांनी पुन्हा त्याचा देखील मोठा तमाशा केला असता. काही दिवस चमकोगिरी करून पुन्हा मूग गिळून गप्प बसले असते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांच्या बाबतीत आपली मनमानी सुरु आहे. राजकारणी बैठका घेतात. खासदार भेटीला बोलावतात. अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली जाते, जनआंदोलन उभे राहते. आमदार, राजकारणी काही ठराविक विषयांना विरोध केला जातो आणि नंतर पुन्हा जैसे थे असे असते. शहरातील विविद्ध चौकात उभारण्यात आलेल्या सर्कलची जळगावकरांना सवय होणे आवश्यक तर आहेच पण नही आणि प्रशासन, राजकारण्यांनी देखील योग्य मार्ग काढणे गरजेचे आहे.