महसूल कर्मचाऱ्यांना न्याय; संप घेतला मागे
जळगाव लाईव्ह न्युज । १८ एप्रिल २०२२ । महसूल कर्मचाऱ्यांचा गेल्या ५ एप्रिल पासून सुरु असलेला संप अखेर मागे घेण्यात आला असून महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या तत्वता मान्य करण्यात आल्या आहे.
महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या आर्थिक तरतूद, वेतनवाढ वा अन्य आर्थिक कारणामुळे नसून तांत्रिक स्वरूपातील होत्या. यात बहुतांश कर्मचाऱ्यांना नियमित पदोन्नतीसह अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता संदर्भात असल्याने बरेचसे कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र असूनही पदोन्नती न मिळताच सेवानिवृत्त देखील झाले होते.
गेल्या पाच महिन्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात मंत्रालय स्तरावर बैठक घेण्यात येऊन अनुकुलता देखील शासन स्तरावर होती. परंतु शासन निर्णय वा प्रशासकीय संकेत नसल्याकारणाने जिल्ह्यातील १५ तालुकास्तरावर तसेच उपविभागीय, तहसील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. अखेर बुधवार १३ एप्रिल रोजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सचिव डॉ.नितीन करीर यांच्या समवेत पदाधिकारी याची सकारात्मक चर्चा होऊन १० मे २०२१ च्या शासन निर्णयातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी मान्य करण्यात आली. यामळे आता महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या शासन स्तरावरून मान्य करण्यात आल्याने संप मागे घेण्यात आला असून सोमवार १८ एप्रिल रोजी सर्वच कार्यालयात कर्मचारी उपस्थित झाले आहेत.