एसटीचे ९६ कर्मचारी पुन्हा कामावर परतले
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । दिवाळीपासून रुतलेले एसटीचे चाक सुरळीत धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २२ एप्रिलपर्यंत कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले असल्याने मंगळवारी जळगाव विभागात ९६ कर्मचारी कामावर परतले. त्यामुळे एसटी येत्या काही दिवसांत ग्रामीणसह पूर्वीप्रमाणेच पूर्ण क्षमतेने धावताना दिसेल, असे मत विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी व्यक्त केले.
एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. न्यायालयाच्या निकालानंतर जळगाव विभागात प्रथमच ९६ कर्मचारी कामावर परतले. त्यामुळे जळगाव विभागात १२ एप्रिलअखेर पावणेसहाशे कर्मचारी कामावर परतले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांमुळे एसटीच्या रुतलेल्या चाकाला आता गती मिळणार आहे. न्यायालयाने २२ एप्रिल ही तारीख दिल्याने येत्या १० दिवसांत उर्वरित कर्मचारीही कामावर परतणार असल्याने एसटीच्या ग्रामीण फेऱ्यांसह पूर्ण क्षमतेने एसटी धावणार आहे. परजिल्ह्यांसह महाराष्ट्रालगतच्या राज्यांतही एसटीच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत विभागात पावणेसहाशे कर्मचारी कामावर परतले.