जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात हजारो गुन्हेगार असून त्यात किमान काही हजार गुन्हेगार अट्टल आहेत. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा शोध घेताना किंवा आरोपीचा अंदाज लावताना पोलिसांची मोठी शक्ती खर्च होत असते. पोलिसांचे काम सोपे करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून एक अभिनव प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. २०१० पासूनच्या सर्व हिस्ट्रीशिटरची माहिती संकलित करण्याचे काम एलसीबीकडून हाती घेण्यात आले असून हा डिजीटल डाटा संकलित करून एक अँप तयार केले जात आहे. लवकर सर्व अट्टल गुन्हेगारांची माहिती एका क्लीकवर उपलब्ध होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात दररोज विविध प्रकारचे गुन्हे घडत असतात. दरोडा, चोरी, लूट अशा प्रकारच्या गुन्ह्यात आरोपींचा शोध घेताना पोलिसांचा मोठा कस लागतो. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीचा मागोवा घेणे, ड्रमडाटाचा उपयोग करून संशयितांपर्यंत पोहचणे असे कार्य सध्या सुरु आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारांची आकडेवारी लक्षात घेता साधारणतः गुन्हे करणारे ५० टक्के गुन्हेगार स्थानिक अट्टल असतात, ३० टक्के गुन्हेगार नव्याने सक्रीय झालेले गुन्हेगार तर २० टक्के गुन्हेगार बाहेरील जिल्ह्यातील गुन्हेगार असतात. अट्टल गुन्हेगारांची देखील प्रत्येकाची गुन्हे करण्याची पद्धत वेगवेगळी असते, त्यामुळे बऱ्याच वेळा गुन्हेगारांचा शोध घेताना पोलिसांची दमछाक होते.
पोलिसांचे काम सोपे करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार त्यावर काम सुरु असून साधारणतः तीन महिन्यांनी तो प्रकल्प पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून अट्टल गुन्हेगारांचा डिजीटल डाटा संकलित केला जात आहे. गुन्हेगाराची गुन्हे करण्याची पद्धत, दाखल गुन्हे, कुटुंबियांची माहिती, फोटो, वय, तपासी अमलदारांचे नाव असा डाटा त्यात असणार आहे. सर्व माहितीवरून एक अँप तयार केले जाणार आहे.
अशी घेतली जाते माहिती
गुन्हेगारांची माहिती घेताना एलीबीच्या पथकातील दोन कर्मचारी हा डाटा एकसंघ करीत आहेत. २०१० पासून सक्रिय असलेल्या गुन्हेगारांची संपूर्ण माहिती, फोटो, संपर्क क्रमांक घेऊन ते संकलित केले जाते. आजवर जळगाव शहरातील गुन्हेगारांची माहिती पूर्ण झाली असून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील माहिती मागविण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात अंदाजे ३ हजार गुन्हेगार आहेत तर त्यापैकी २०० अट्टल गुन्हेगार जळगाव शहरात आहेत.
अँपचा असा होणार फायदा
जिल्हा पोलीस प्रशासनाने तयार केलेल्या अँपमुळे पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करताना फायदा होणार आहे. जिल्ह्यात एखादा गुन्हा घडल्यास तो गुन्हा करण्याची पद्धत, त्याच्याशी संबंधित पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांची सद्यस्थिती अँपमधून कळणार आहे. गुन्हा घडताच काही तासात त्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळणे शक्य होईल. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व काम सुरु आहे.