जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । जळगाव : येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाला ई एस आय एस अर्थात एम्प्लाइज स्टेट इन्शुरन्स स्कीम लागू झाली आहे. याचा फायदा जळगाव जिल्ह्यातील कामगारांना होणार असून, रूग्णालयातील मोफत वैद्यकीय सेवेचा त्यांना लाभ घेता येणार आहे.
ही योजना औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे. संबंधित कामगार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांसाठी मोफत वैद्यकीय सेवा व उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
देवकर रुग्णालयात यापूर्वीच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजना लागू झाली आहे. त्याचा शेकडो नागरिकांना मोफत उपचारासाठी लाभ होत आहे.
ई एस आय एस योजना लागू करण्यापूर्वी शासनाच्या संबंधित कमिटीने रुग्णालयातील सुविधा व उपलब्ध स्टाफची पाहणी करून देवकर रूग्णालयात योजना लागू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना या रुग्णालयात उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा व उपचार मोफत मिळणार आहेत. ऍडमिट झाल्यापासून तर डिस्चार्ज होईपर्यंत कामगारांना एक रुपयाही खर्च न करता येथे अत्याधुनिक वैद्यकीय सेवा व उपचार उपलब्ध होणार आहेत.
देवकर रूग्णालयात सर्व आजारांवर एकाच छताखाली उपचाराची सुविधा उपलब्ध असून, रुग्णालयातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असा आय सी यु विभाग, सोनोग्राफी, एक्स-रे, ई सी जी, सिटीस्कॅनची सुविधा, याशिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे चार स्वतंत्र ऑपरेशन थिएटर्स उपलब्ध आहेत. याशिवाय रुग्णालयाचा रुग्णालयाचा स्वतंत्र ऑक्सीजन प्रकल्प देखील आहे. कामगारांनी रूग्णालयातील या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवकर रुग्णालय प्रशासनाने केले आहे.