⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | बातम्या | केळी करपा नियंत्रणासाठी केळी पिकाचा केंद्राच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये समावेश करावा – रक्षा खडसे

केळी करपा नियंत्रणासाठी केळी पिकाचा केंद्राच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये समावेश करावा – रक्षा खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । केळी करपा (सिगारोटा) नियंत्रणासाठी केळी पिकाचा केंद्राच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये समावेश करण्यात यावा याबाबत आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिल्ली येथे केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्री.कैलास चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले व मागणी केली. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, कृषी सचिव एकनाथ डवले, खासदार हेमंत गोडसे, खासदार राजेंद्र गावित, खासदार हेमंत पाटील हे उपस्थित होते.

राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) अंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये सन २०१०-११ ते २०१६-१७ या ७ ते ८ वर्षामध्ये केळी करपा योजना राबविण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील केळीवर नेहमी येणारा करपा हा रोग बऱ्याच प्रमाणत नियंत्रणात आला होता. परंतु, गेल्या ४ ते ५ वर्षापासुन सदरील योजना कृषी विभागामार्फत शासकीय अनुदानावर राबविण्याचे बंद केल्यामुळे जिल्ह्यामध्ये केळीवरील करपा रोग वाढण्याची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. केळी करपा रोग नियंत्रणात आणण्यासाठी ज्या निविष्ठांचा वापर करण्यात येत होता, त्या सर्व निविष्ठा शेतकर्‍यांना एका ठिकाणी उपलब्ध होत नाहीत.

महाराष्ट्र राज्यात जळगांव जिल्हा हा केळी उत्पादन घेणारा सर्वात मोठा जिल्हा असुन, केळी करपा नियंत्रणासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत १००% अनुदान मिळावे याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे व कृषी सचिव यांना पत्राद्वारे मागणी केली होती.

त्यानुसार आज खासदार रक्षा खडसे यांनी महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी सचिव एकनाथ डवले व राज्यातील काही खासदारसह केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्री.कैलास चौधरी यांची भेट घेऊन केळी करपा नियंत्रणासाठी केळी पिकाचा केंद्राच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत समावेश करावा याबाबत मागणी केली. यावर महाराष्ट्र शासनाने याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करून ८ दिवसात केंद्राकडे पाठवावा असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी राज्याचे कृषिमंत्री व कृषी सचिव यांना सुचना केल्या.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.