विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला, दर्जेदार होणार महोत्सव
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित युवारंग महोत्सवाच्या तारखा नुकतीच जाहीर करण्यात आल्यानंतर युवकांच्या तयारीला वेग आला आहे. दोन वर्षांनंतर महोत्सव होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे. दरम्यान, कोरोनामुळे विद्यार्थी महाविद्यालयात येऊ न शकल्याने नेमक्या कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण काय हे समजणे कठीण होत असले तरी असंख्य कलाकार यामुळे समोर येत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
कलाकारांना मोठे व्यासपीठ
सृजनशील व संवेदनशील कलाकारांच्या कलेला चालना देण्याकरिता युवारंग उत्कृष्ट माध्यम आहे. यातून तयार होणारे कलाकार उद्याच्या भारताची नवी ओळख निर्माण करणारे असतील. डॉ. मनोज महाजन, समन्वयक
तालीमसाठी अधिक वेळ, तयारीला वेग
दोन वर्षांनंतर युवारंग होत असल्याने अंगात ऊर्जा निर्माण झाली आहे. महा-विद्यालयात जोरात तयारी सुरू असून अधिकाधिक वेळ तालमीसाठी दिला जात आहे. तसेच अन्य तयारीला वेग दिला आहे. सिद्धांत सोनवणे, विद्यार्थी
वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न
मी स्वतः युवारंग महोत्सवात विविध कला प्रकारात सहभागी झालो असून आता समन्वयक म्हणून काम बघत आहे. आपले स्थान कसे निश्चित करता येईल यासाठी विद्यार्थ्यांची सध्या धडपड सुरू आहे. बापूसाहेब पाटील, समन्वयक
पहिल्यांदा सहभागी
मी पहिल्यांदाच युवारंगमध्ये सहभागी होत आहे. तालमीत देखील नवनवीन प्रकार शिकायला मिळत आहे. मी मूकनाट्य या कला प्रकारात भाग घेतला असून, तयारी सुरु आहे. कोमल माळी, विद्यार्थिनी