⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

खुशखबर ! पालकमंत्र्यामुळे जळगाव महापालिकेच्या २ कोटी ८० लक्ष रूपयांच्या कामांना मान्यता

जळगाव लाईव्ह न्युज | १२ मे २०२२ | जळगावातील पदाधिकारी आणि नगरसेवकांनी केलेल्या मागणीनुसार पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा महापालिकेला निधी प्रदान केला असून यासोबत धरणगावातील कामालाही अतिरिक्त बुस्टर डोस मिळालेला आहे.पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास खात्याकडून जळगाव महापालिकेस २ कोटी ८० लक्ष रूपयांच्या कामांना आज मान्यता देण्यात आली

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास खात्याकडून जळगाव महापालिकेस २ कोटी ८० लक्ष रूपये तर धरणगाव नगरपालिकेसाठी २ कोटी २० लक्ष अशा एकूण ५ कोटी रूपयांच्या कामांना आज मान्यता देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय (जीआर) देखील निर्गमीत करण्यात आलेला आहे. यात जळगाव शहरातील विविध रस्त्यांच्या कामाला मान्यता मिळाली असून यामध्ये जिल्हा परिषद चौक ते बळीरामपेठ या अतिशय महत्वाच्या रस्त्याचा समावेश आहे. तर या निधीतून धरणगाव नगरपालिकेच्या अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजना (वाढीव वितरण व्यवस्था ) या कामाला देखील अतिरिक्त निधी मिळाला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, जळगाव शहराच्या विकासासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यापूर्वी ६३ कोटी रूपयांचा निधी प्रदान केला असून यातून शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. यासोबत महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांनी वाढीव निधीची मागणी केली होती. याचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नगरविकास खात्याकडे पाठपुरावा केला. राज्यातील महानगरपालिकांना मूलभूत सोयी सुविधांचा विकास करण्याच्या कामासाठी अनुदान देण्यात येते. त्या अनुषंगाने जळगाव महापालिका क्षेत्रात “मूलभूत सुविधांचा विकास” या योजनेच्या अंतर्गत ४ कामांसाठी २ कोटी ८० लक्ष निधीस मंजुरी देण्यात आलेली आहे. या कामांमध्ये शहरातील दत्त दिगंबर व गुलमोहर सोसायटी गट नंबर १५२ / ४ १५२ २ मधील रस्ते डांबरीकरण करणे- ६२ लक्ष ८२ हजार रूपये; प्रभाग क्रमांक ११ पिंप्राळा गट नंबर १०१ ,मुंदडा नगर मधील रस्ते डांबरीकरण करणे- १ कोटी ३५ लाख ९० हजार; प्रभाग क्रमांक ११ पिंप्राळा गट नं.१०१, मुंदडा नगरमधील आरसीसी गटार बांधकाम करणे तसेच जिल्हा परिषद चौक ते बळीराम पेठ रस्ता डांबरीकरण करणे – ८१ लक्ष २८ हजार असे एकूण २ कोटी ८० लक्ष या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. यातील जिल्हा परिषदेचा मुख्य चौक ते बळीरामपेठ हा रस्ता अतिशय महत्वाचा असून पुलाच्या कामामुळे हा रस्ता खराब झाला असून याच्या दुरूस्तीची कधीपासूनच मागणी करण्यात येत होती. आता यासाठी निधी आल्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.

दरम्यान, यासोबत, राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान देण्यात येते. त्यानुसार, धरणगाव नगरपरिषदेला या योजनेच्या अंतर्गत पाणी पुरवठा योजना (वाढीव वितरण व्यवस्था ) करण्यासाठी २ कोटी २० लक्ष रूपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आलेली आहे. यातून अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या कामासाठी अतिरिक्त निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जळगाव आणि धरणगाव येथील कामांना मिळालेल्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय (जीआर) हा नगरविकास खात्याने आजच निर्मगीत केलेला आहे.

या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव शहरासाठी निधीची कोणतीही कमतरता पडणार नाही असे अभिवचन मी शहरवासियांना दिले असून याच्या पूर्ततेसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. या अनुषंगाने आता वाढीव ४ कामांना मान्यता मिळालेली असून येत्या काळात अजून अन्य कामांना देखील वेग येणार आहे. तर धरणगाव शहराच्या इतिहासातील मैलाचा टप्पा ठरणार्‍या पाणी पुरवठा योजना (वाढीव वितरण व्यवस्था ) यासाठी सुध्दा अत्यावश्यक असणारा निधी मिळणार असून या कामांना गती येणार आहे.