जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२२ । जळगावकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. तब्बल दोन वर्ष ७ दिवसानंतर जळगाव जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात ४ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर आज एकही नवीन बाधित रुग्ण आढळून आला नाहीय.यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाचा एकही सक्रीय पेशंट उरलेला नाही. यामुळे दोन वर्षे आणि सात दिवसानंतर जळगाव जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मार्च २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला होता. यानंतर पहिल्या आणि दुसर्या लाटेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेशंट आढळून आले होते. तर विशेष करून दुसर्या लाटेत मृत्यूंची संख्यादेखील लक्षणीय होती. दरम्यान, लसीकरण झाल्यामुळे जिल्ह्यास तिसर्या लाटेचा फटका बसला नाही. काही दिवसांपासून जिल्ह्यात खूप कमी रूग्ण आढळून येत आहेत. तर आज जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या रिपोर्टनुसार आता जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण उरलेला नाही. या पार्श्वभूमिवर कोरोनामुक्तीची बातमी ही नवीन उभारी देणारी ठरली आहे.