⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणाचा आहे थेट सातवहन साम्राज्याशी संबंध; गुढीपाडव्याशी आहे विशेष नाते… जाणून घ्या सविस्तर

जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणाचा आहे थेट सातवहन साम्राज्याशी संबंध; गुढीपाडव्याशी आहे विशेष नाते… जाणून घ्या सविस्तर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 21 मार्च 2023 । शालिवाहन शके अर्थात मराठी कालगणनेनुसार गुढीपाडव्याचा दिवस हा नववर्षदिन असतो. यामुळे शककर्ते कोण होते? असा प्रश्‍न अनेकांना पडतो. काही इतीहासकारांच्या मते शालिवाहनाने शकांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून शालिवाहन शक ही नवीन कालगणना तत्कालीन मराठी मुलखात सुरू झाल्याचे म्हटले जाते.

महाराष्ट्रातील आद्य राजवंश म्हणून सातवाहन वंश प्रख्यात आहे. सातवाहन काळात महाराष्ट्राची खर्‍याअर्थी भरभराट झाली. सम्राट अशोकाच्या निधनानंतर (इ. स. पू. २३२) हा वंश उदयाला आला असावा. मौर्य साम्राज्याचा शक्तिशाली सम्राट अशोक याच्या मृत्यूनंतर सातवाहनांनी स्वतःस स्वतंत्र घोषित केले. सातवाहनांचा द्वितीय राजा कृष्ण याने आपले साम्राज्य नाशिकपर्यंत वाढवले.

सातवाहन साम्राज्यातील सर्वात प्रख्यात सम्राट म्हणून गौतमीपुत्र सातकर्णी याचे नाव घेतले जाते. गौतमीपुत्राने भारताच्या पश्चिम दिशेस स्थापित झालेली परकीय शक व क्षत्रप आदींची राज्ये पराभूत करून स्वतःच्या नावे कालगणना सुरु झाली ज्यास शालिवाहन शक या नावाने ओळखले जाते व या कालगणनेचे आजही समस्त मराठी जनतेकडून पालन केले जाते.

सातवाहन राजांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत प्रगती झाली. सातवाहनांचा धर्म आणि वाङ्मय यांना उदार आश्रय होता. त्यांचा बौद्घ धर्मालाही आश्रय होता. कृष्ण, गौतमीपुत्र सातकर्णी, पुळुमावी आणि यज्ञश्री सातकर्णी यांनी बौद्घ भिक्षूंकरिता लेणी कोरवून ग्रामदाने दिल्याचे उल्लेख कोरीव लेखांत आले आहेत. अशी अनेक लेणी महाराष्ट्रात भाजे, कोंडाणे, कर्‍हाड, बेडसा, कार्ले, नासिक, जुन्नर, पितळखोरे, अजिंठा वगैरे ठिकाणी अद्यापि विद्यमान आहेत. महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर (जळगाव जिल्हा) नुसार, ‘सातवाहन’ घराण्यातील पहिला मोठा राजा सिमुक हा होय, याने विस्तृत प्रदेश जिंकल्यावर दक्षिणापथपती ही पदवी धारण केली होती. तेंव्हापासून ते निदान इसवीच्या दुसर्‍या शतकातील यज्ञश्री सातकर्णीच्या कारकिर्दीपर्यंत जळगाव जिल्ह्यावर सातवाहनांचे अधिराज्य होते’.

वर उल्लेख केलेले पितळखोरे हे जळगाव जिल्ह्यात येते. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या जळगाव जिल्हा कॉफीटेबल बुकमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. यानुसार, ‘पितळखोरे’ हा प्राचीन लेणीसमूह जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरापासून सुमारे ३५ कि.मी. अंतरावर आहे. राजा सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) ते नालासोपारा हा अतिप्राचीन रहदारीचा प्रमुख मार्ग पितळखोर्‍याहून जात होता. त्यामुळेच लेणी कोरण्यासाठी या जागेची निवड अतिशय योग्य वाटते. ‘महामायुरी’ या बौद्ध ग्रंथामध्ये ‘शकरीन’ हा यक्ष ‘पितलिंगया’ येथे राहतो, असा उल्लेख आला आहे. वरील ग्रंथाच्या संदर्भातून पितलिंगया म्हणजे आताचे पितळखोरे असे अभ्यासक म्हणतात.

पितळखोरे हा भारतातील सर्वात प्राचीन लेणीसमूह असून तो शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. येथील लेणी खोल व अरुंद दरीच्या दोन्ही काठांवरील दगडात कोरलेली आहेत. लेण्यांचे पाण्याच्या प्रवाहामुळे दोन भाग झाले आहेत. एका भागात क्र. १ ते ९ व दुसर्‍या भागात क्र. १० ते १२ लेणी आहेत. दोन्ही गटांतील लेणी एकामेकांसमोर आहेत. येथून एक मार्ग औरंगाबादकडे जातो. इंग्रज शास्त्रज्ञ विल्सन फर्ग्युसन व बर्जेस यांनी ही लेणी प्रथम लोकाभिमुख केली. येथील पुरातत्त्वीय संशोधनावरून ही लेणी दुसर्‍या शतकाच्या जवळपास वापरात होती. नंतर पुन्हा पाचव्या सहाव्या शतकात येथे वर्दळ सुरू झाली. हे दोन्ही काळ अनुक्रमे सातवाहन व वाकाटकांचे होते.

लेण्यांच्या प्रवेशद्वाराला अकरा पायर्‍या आहेत. उजव्या बाजूस हत्तींची रांग आहे. जणू काही लेण्यांचा सर्व भार हे हत्तीच पेलत आहेत असा भास होतो. प्रवेशद्वाराचा पट्टा अर्धकमळ व त्रिरत्नांच्या नक्षीने सजविला आहे. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन द्वारपाल रुबाबात उभे आहेत. येथे द्वारपालाच्या वरच्या बाजूस हत्तीचे शिल्प आहे. उजव्या हत्तीच्या वर किन्नराचे शिल्प आहे. या लेणीतील काही गुहा दुमजली आहेत. वर जाण्यास भुयारातून पायर्‍या खोदलेल्या आहेत. मुख्य गुंफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे. मधल्या भागात ३५ स्तंभ असून त्यावर धवल, कृष्ण, रक्त आणि तपकिरी वा पिंगट रंगात रंगविलेली बौद्ध संन्याशांची चित्रे आहेत.

भोवतालच्या दालनातील छत सिंहासनाधिष्ठित आणि छत्रधारी बुद्धप्रतिमा चितारून सजवले आहे. मुंडण केलेल्या व गुडघे टेकून वंदन करणार्‍या मुलांच्या प्रतिमादेखील रंगवलेल्या आहेत. स्त्री-पुरुष यांच्या आकृतीही येथे दिसतात. चैत्य लेणी क्र. ३ आणि विहार लेणी क्र. ४ यांच्या दर्शनी भागात गन्धिक कुलातील मितदेव आणि पैठणचे संघकपुत्र यांचे दानलेख आहेत. विहार लेणी क्र. ४ येथील गजथर हा प्राचीन भारतीय वास्तुशिल्पातील चौथर्‍यावर दाखविलेला पहिला गजथर आहे. हे हत्ती अलंकारयुक्त असून त्यांच्या दोन्ही बाजूंना घंटा लोंबताना दिसतात. या लेण्यांच्या प्रवेशद्वारावरील द्वारपाल लक्षणीय आहेत. या लेण्यांतील एक अप्रतिम शिल्प म्हणजे राजा-राणी शिल्प होय. या राजदंपतीस भारतीय शिल्पकला क्षेत्रात एक आगळे-वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे…
(साभार : जळगाव जिल्हा कॉफीटेबल बुक)

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.